पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! महाराष्ट्रातील शाळांची वेळ बदलणार? उकाड्यामुळे मोठी चर्चा

मुंबई : राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनच्या पावसाने अद्याप दमदार हजेरी लावलेली नसल्याने उष्णता आणि दमट हवामानाचा त्रास कायम आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, विदर्भ वगळता महाराष्ट्रातील सर्व शाळा पुढील काही दिवस सकाळच्या सत्रात भरवाव्यात, अशी मागणी ॲक्टिव्ह टीचर्स फोरमने राज्य सरकारकडे केली आहे.

फोरमचे राज्य संयोजक भाऊ चासकर यांनी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. राज्यातील अनेक शाळांमध्ये अद्याप पत्र्याच्या वर्गखोल्या असल्याने दुपारच्या वेळी वर्गांमध्ये प्रचंड उकाडा जाणवतो. त्यातच वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांना अधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
ग्रामीण आणि डोंगराळ भागातील अनेक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून स्वच्छतागृहांसाठीही पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. विशेषतः विद्यार्थिनींना याचा मोठा फटका बसत असल्याने शाळांच्या वेळेत तातडीने बदल करण्याची आवश्यकता असल्याचे फोरमचे म्हणणे आहे.

दरवर्षी वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेतला जातो. यंदाही विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात हा निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. आता यावर शिक्षण विभाग आणि राज्य सरकार कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
