नात्याला काळीमा फासणारी घटना! पैशाच्या वादातून सासऱ्याचाच मुलगा-सुनेवर कार घालण्याचा प्रयत्न; तिवसा परिसरात खळबळ


अमरावती : अमरावती जिल्ह्यातील तिवसा परिसरात कौटुंबिक व आर्थिक वादातून एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. हॉटेलच्या भाड्याच्या पैशावरून निर्माण झालेल्या वादातून सासऱ्यानेच आपल्या मुलगा आणि सुनेच्या अंगावर कार घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही घटना घडताच परिसरात मोठी खळबळ उडाली असून संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिवसा परिसरात एका कुटुंबाचे “तुळजाई रेस्टॉरंट” नावाचे हॉटेल असून ते मुलगा आणि सुनेच्या नावावर आहे. मात्र या हॉटेलचे भाडे सासरे घेत असल्यावरून गेल्या काही दिवसांपासून कुटुंबात वाद सुरू होता. भाड्याच्या पैशांवरून दोन्ही बाजूंमध्ये सतत तणाव वाढत गेला आणि अखेर या वादाचे रूपांतर हिंसक घटनेत झाले.

घटनेच्या दिवशी हॉटेलमध्येच कुटुंबीयांमध्ये जोरदार वाद झाला. आरोपानुसार, सासऱ्याने आधी मुलगा आणि सुनेशी शिवीगाळ करून वाद घातला आणि त्यानंतर रागाच्या भरात तेथून निघून गेला. काही वेळानंतर तो पुन्हा कार घेऊन घटनास्थळी आला आणि थेट मुलगा व सुनेच्या दिशेने वाहन घातल्याचा आरोप आहे. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे दोघेही थोडक्यात बचावले.

या घटनेदरम्यान सून अश्विनी खान यांनी सांगितले की, त्या पतीसोबत हॉटेलमध्ये उपस्थित होत्या. वाद वाढल्यानंतर सासऱ्याने अचानक कार त्यांच्या दिशेने वळवली. त्या वेळी त्या पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न करत होत्या, मात्र तोपर्यंत कार त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला. या घटनेत त्यांच्या पायाला आणि पाठीला दुखापत झाली असून हॉटेलचेही मोठे नुकसान झाले आहे.

संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “रक्ताचे नाते विसरून असा प्रकार कसा घडू शकतो?” असा प्रश्न परिसरात उपस्थित होत आहे.

पीडित सुनेने पोलिसांत तक्रार दाखल करत आपला आणि कुटुंबाचा जीव धोक्यात असल्याचे सांगितले आहे. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही तिने केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. आर्थिक वादाचे नेमके स्वरूप, मालमत्तेचे वाटप आणि घटनेमागील संपूर्ण कारण तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!