शिक्रापूर येथे पुणे- नगर महामार्गावर झालेल्या अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू; अन्य दोघे जखमी

पुणे : कारला कुत्रे आडवे आल्याने कुत्र्याला वाचवताना कार रस्त्याच्या कडेला जाऊन झाडाला धडकली. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाल्याची धक्कादायक घटना पुणे-नगर रस्त्यावर शिक्रापूर येथून समोर आली आहे.
प्रीतेश प्रेमचंद संचेती (वय ३७, रा. विप्रनगर, ता. बीड) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर नीरज मदनलाल अग्रवाल व मयूर प्रशांत लांडे हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी बीडचे नगरसेवक अमोल मारुतीराव नाईकवाडे (४३, रा. विप्रनगर, ता. बीड) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारा-पंधरा योगा ग्रुपच्या मित्रांसोबत प्रीतेश संचेती हे पुण्याला गेले होते. रविवारी दुपारी ते पुण्यावरून ब्रिझा गाडीतून आपले दोन मित्र मुकेश अग्रवाल आणि मयूर लांडे यांच्यासह बीडच्या दिशेने निघाले होते.
दुपारी साडे चारच्या सुमारास शिक्रापूरजवळ प्रीतेश संचेती यांच्या कारला अचानक कुत्रा आडवा आल्याने कुत्र्याला वाचवण्यासाठी कार बाजूला घेत असताना कार रस्त्याच्या कडेला असेलल्या झाडाला आदळली.या अपघातात संचेती यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये अग्रवाल आणि लांडे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघातात एक जणाचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जखमी झाले असून जखमींना पुण्यातील संचेती हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बापू हाडगळे हे करीत आहेत.