मतदानाचा धुरळा शांत होताच महागाईचा भडका; पेट्रोल-डिझेल दरात मोठी वाढ

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी संपताच सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून शुक्रवारपासून नवीन दर लागू करण्यात आले आहेत. पेट्रोल प्रति लिटर 3 रुपयांनी तर डिझेल 3.11 रुपयांनी महागले आहे. या दरवाढीमुळे वाहनधारकांसह वाहतूक आणि किरकोळ बाजारावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवीन दरांनुसार मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106.54 रुपये प्रति लिटरवर पोहोचला असून डिझेल 93.14 रुपये झाले आहे. पुण्यात पेट्रोल 107.84 रुपये तर डिझेल 94.45 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. राज्यातील इतर शहरांमध्येही स्थानिक करांनुसार इंधनाचे दर बदलले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे तेल कंपन्यांचा खर्च वाढत असल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम जागतिक तेल बाजारावर दिसून येत आहे.

राजकीय वर्तुळात निवडणुकांमुळे दरवाढ लांबवण्यात आल्याची चर्चा होती. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर तेल कंपन्यांचा वाढता तोटा लक्षात घेऊन सरकारने अखेर दरवाढीचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

या निर्णयामुळे वाहतूक खर्च वाढणार असून त्याचा परिणाम भाजीपाला, दूध, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे. विरोधकांनी सरकारवर निशाणा साधत “निवडणुका संपल्या आणि महागाईचा बोजा जनतेवर टाकला” अशी टीका केली आहे. तर सरकारकडून जागतिक परिस्थितीमुळे हा निर्णय आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे.