अंड आता सोन्याच्या भावात? ९ रुपयांपासून थेट २५ रुपयांपर्यंत दर जाण्याची शक्यता; नेमका कोणता खेळ सुरू आहे?


पुणे : महागाईने आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांसाठी आता अंड्यांच्या दराबाबतही चिंता वाढली आहे. सध्या किरकोळ बाजारात एका अंड्याची किंमत साधारण ८.५० ते ९ रुपये आहे. मात्र, आगामी हिवाळ्यात ब्रँडेड आणि प्रिमियम अंड्यांचे दर २० ते २५ रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे अंड्यांच्या दरवाढीमागे नेमकं कारण काय, याची चर्चा सुरू झाली आहे.

कुक्कुटपालन उद्योगासाठी सर्वात मोठी अडचण सध्या खाद्याच्या वाढत्या किमतींची आहे. कोंबड्यांच्या खाद्यात साधारण ६० ते ७० टक्के मका वापरला जातो. त्यामुळे मक्याच्या दरात झालेली वाढ थेट अंड्यांच्या उत्पादन खर्चावर परिणाम करत आहे. गेल्या तीन वर्षांत मक्याचा दर प्रति टन १४ हजार रुपयांवरून तब्बल २६ हजार ६०० रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.

मक्याच्या वाढत्या दरामागे इथेनॉल निर्मितीचाही मोठा वाटा आहे. भारतात सुमारे ४३.४ दशलक्ष टन मक्याचे उत्पादन होते. त्यापैकी जवळपास १७ दशलक्ष टन मका इथेनॉल निर्मितीसाठी वापरला जात असल्याचे आकडेवारीत नमूद आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योगासाठी लागणाऱ्या मक्याच्या उपलब्धतेवर आणि किमतीवर दबाव वाढला आहे.

फक्त मका महागलेला नाही, तर कोंबड्यांच्या खाद्यात वापरल्या जाणाऱ्या सोयाबीनच्या किमतीतही वाढ झाली आहे. परिणामी पोल्ट्री व्यावसायिकांचा उत्पादन खर्च वाढत आहे. हा वाढीव खर्च पुढे अंड्यांच्या बाजारभावात दिसण्याची शक्यता आहे.

त्यातच हिवाळ्यात अंड्यांची मागणी वाढते. वाढती मागणी आणि वाढता उत्पादन खर्च एकाच वेळी आला, तर दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्षभरात अंड्यांच्या किमतीत आधीच ३५ ते ४० टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, २० ते २५ रुपयांचा आकडा सर्व अंड्यांसाठी लागू होणार नाही. हा अंदाज मुख्यतः प्रिमियम आणि ब्रँडेड अंड्यांसाठी आहे. सामान्य अंड्यांचे दर किती वाढतील, हे स्थानिक बाजारातील मागणी-पुरवठा, उत्पादन खर्च आणि हिवाळ्यातील परिस्थितीवर अवलंबून असेल. त्यामुळे पुढील काही महिन्यांत अंड्यांच्या दरावर ग्राहकांचे बारकाईने लक्ष राहणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!