पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी! विठुरायाच्या नगरीत मोठा विकास आराखडा, भाविकांना मिळणार सुलभ दर्शन

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरसाठी मोठा विकास निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ शिखर समितीच्या बैठकीत पंढरपूर कॉरिडॉर आणि विकास आराखड्याला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे, वनमंत्री गणेश नाईक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सुमारे 4000 कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी आराखडा असून पंढरपूर मंदिर परिसराचा संपूर्ण कायापालट करण्याचा सरकारचा मोठा मानस आहे. पुढील 50 वर्षांत वाढणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा विचार करून हा कॉरिडॉर आणि शहर विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. 1 ऑगस्टपर्यंत भूसंपादन आणि इतर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
विठ्ठलाच्या पंढरीत दरवर्षी लाखो भाविक येतात. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला तर लाखोंचा जनसागर लोटतो. गेल्या आषाढीला तब्बल 28 लाख भाविक आल्याची नोंद झाली होती. “विठुरायाचं दर्शन सगळ्यांना सहज मिळावं” हा या आराखड्यामागचा मुख्य हेतू आहे. मंदिर परिसरात गर्दीमुळे होणाऱ्या अडचणी, अपघात टाळणे आणि दर्शनाची सोय सुलभ करणे यावर भर देण्यात आला आहे.

स्थानिक व्यापाऱ्यांनी सुरुवातीला या कॉरिडॉरला विरोध दर्शवला होता. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट आश्वासन देत सांगितले की, “या विकासामुळे व्यापाऱ्यांचा व्यवसाय कमी नाही तर दहापट वाढेल.” त्यामुळे आता विरोध मावळत असल्याचे चित्र आहे.

पंढरपूरला ‘ड्रीम प्रोजेक्ट’ मानून सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे ”आता पंढरीचं रूपडं बदलणार आणि विठुरायाच्या दर्शनाला जायची वाट आणखी सोपी होणार!”