जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल भारताची माफी मागा, ब्रिटिश संसदेत खासदार आक्रमक…

नवी दिल्ली : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्वाची घटना असलेले जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरण आता पुन्हा चर्चेत आले आहे. या हत्याकांडाला १०६ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर आता ब्रिटनच्या संसदेत तेथीलच एका खासदाराने या हत्याकांडासाठी ब्रिटनने भारताची औपचारिक माफी मागावी, अशी मागणी केली आहे. या मागणीवरून ब्रिटनच्या संसदेत गदारोळ झाला.
ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी ही मागणी केली. सन १९१९ मध्ये पंजाबमधील जालियनावाला बाग येथे हे हत्याकांड (Jallianwala Bagh massacre) घडले होते. ब्लॅकमॅन यांनी या घटनेचा उल्लेख ब्रिटिशांच्या वसाहत काळाच्या इतिहासातील ‘लाजिरवाणा काळा डाग’ असे संबोधित केले आहे.
दरम्यान, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या १०६ व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर, ब्रिटिश सरकारने या घटनेसाठी माफी मागावी का? यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच, ब्रिटिश कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे (हुजुर पक्ष) खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी सरकारला या अमानवीय कृत्याची जबाबदारी स्वीकारून औपचारिक माफी मागण्याचे आवाहन केले.
काय म्हणाले खासदार बॉब ब्लॅकमॅन?
ब्रिटन सरकारने औपचारिक जाहीर माफी मागावी
हत्याकांडातील अन्याय मान्य करून अधिकृत विधान करावे
ही घटना म्हणजे ब्रिटिशांच्या वसाहतकालीन इतिहासावरील “लाजिरवाणा काळा डाग” म्हटले आहे
13 एप्रिलपुर्वी माफी मागा – ब्लॅकमॅन
संसदेत बोलताना, ब्लॅकमॅन यांनी 13 एप्रिल 1919 च्या त्या भयानक घटनेची आठवण करून दिली. यात जालियनवाला बाग येथे ब्रिटिशांच्या निषेधासाठी जमलेल्या भारतीयांवर जनरल डायरच्या आदेशाने ब्रिटिश सैन्याने बेछूट गोळीबार केला होता.
ते म्हणाले की, “त्या दिवशी अनेक कुटुंबे जालियनवाला बागेत शांतता निषेधासाठी जमली होती. मात्र, ब्रिटिश सैन्याच्या नेतृत्वाखालील जनरल डायरने आपल्या सैनिकांना नागरीकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला आणि पूर्ण दारुगोळा संपेपर्यंत हा नरसंहार सुरूच राहिला.
या घटनेत १५०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले तर १२०० हून अधिक लोक जखमी झाले, असे ब्लॅकमॅन म्हणाले.
यंदा १३ एप्रिल रोजी या घटनेचा स्मृतिदिन येत आहे, मात्र त्यावेळी ब्रिटिश संसदेची सुट्टी असेल. त्यामुळे, त्या अगोदर सरकारने अधिकृत विधान जारी करून काय चूक झाली हे मान्य करावे आणि भारतातील जनतेची माफी मागावी, असे आवाहन त्यांनी केले.
माजी पंतप्रधान थेरेसा मे यांनीही माफी मागितली नव्हती..
ब्लॅकमॅन यांनी याकडेही लक्ष वेधले की, २०१९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान थेरेसा मे यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाला ब्रिटिश राजवटीच्या काळातील काळा डाग म्हटले होते, मात्र त्यांनी याबाबत औपचारिक माफी मागितली नव्हती.
जनरल डायरला त्याच्या कृत्यासाठी अपमानास्पदरीत्या पदच्युत करण्यात आले होते. परंतु हा ब्रिटिश वसाहती काळातील लाजिरवाणा इतिहास आहे, असे २०१९ मध्ये थेरेसा मे यांनी म्हटले होते.