पुण्यात पुन्हा संतापजनक घटना! 10 वर्षीय मुलीवर सावत्र बापाचा सलग दोन दिवस अत्याचार; आरोपी अटकेत

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात पुन्हा एकदा संतापजनक घटना घडली आहे. कामानिमित्त बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या एका कुटुंबातील 30 वर्षीय सावत्र बापाने 10 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब भोर तालुक्यातील एका गावात कामासाठी वास्तव्यास आले होते. 17 आणि 18 जुलै रोजी आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. अत्याचारानंतर मुलीला शारीरिक त्रास जाणवू लागल्याने तिने घडलेला प्रकार आईला सांगितला.

यानंतर पीडित मुलीच्या आईने स्थानिक नागरिक आणि मुकादमाच्या मदतीने राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पीडित मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करत आहेत. या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.


