पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका! CNG-PNG दरात पुन्हा वाढ; पेट्रोल-डिझेल महागण्याचीही चर्चा


पुणे : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या खर्चाने आधीच त्रस्त असलेल्या पुणेकरांना आता आणखी एक आर्थिक झटका बसला आहे. शहरात CNG आणि PNG च्या दरात वाढ करण्यात आली असून ही दरवाढ सोमवार मध्यरात्रीपासून लागू झाली आहे.

MNGL (महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड) ने CNG च्या दरात प्रतिकिलो 1 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे CNG चा दर आता 95.75 रुपये प्रतिकिलो झाला आहे. तसेच PNG च्या दरातही 85 पैशांची वाढ करण्यात आली आहे.

नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात झालेली वाढ हे या दरवाढीमागचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.या दरवाढीमुळे CNG वाहनधारकांच्या इंधन खर्चात वाढ होणार असून सर्वसामान्य नागरिकांच्या बजेटवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) च्या निर्यातीवरील शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार डिझेलच्या निर्यातीवर प्रतिलिटर 14 रुपये, तर ATF च्या निर्यातीवर प्रतिलिटर 12.50 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. मात्र पेट्रोलच्या निर्यातीवरील शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार का, अशी चर्चा सुरू झाली असली तरी सध्या तरी ग्राहकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. देशांतर्गत विक्री होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याने पेट्रोल पंपावरील दरांवर या निर्णयाचा तात्काळ परिणाम होणार नाही.

तज्ज्ञांच्या मते, भविष्यात इंधनाचे दर वाढतील की नाही हे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती, भू-राजकीय घडामोडी आणि सरकारी कर धोरणांवर अवलंबून असेल. त्यामुळे सध्या CNG-PNG ग्राहकांना दरवाढीचा फटका बसला असला, तरी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये तातडीने वाढ होण्याची शक्यता कमी मानली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!