अन् भर भाषणातच अजित पवारांनी मागितली जाहीर माफी, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या!..

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज वढू-तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी त्यांचं भव्य स्मारक उभारण्याच्या कामाचं भूमीपूजन झाले आहे.
यावेळी अजित पवार यांनी भाषण करताना संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांना नंतर माफी मागावी लागली आहे. छत्रपती संभाजी महाराज हे एकही निवडणूक लढले नाहीत, असं विधान अजित पवार यांनी आपल्या भाषणात केले आहे.
त्यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना करेक्शन सांगितलं आणि त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या विधानावर लगेचच माफी मागितली आहे. आपल्याला लढाई म्हणायचं होतं, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.
लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीशिवाय काय समजत नाही. पण आमच्यामध्ये एक निष्णांत देवेंद्र फडणवीस आहेत. असं काही झालं की लगेच तिथल्या तिथे लक्षात आणून देतात. त्याबद्दल धन्यवाद देवेंद्रजी. असंच नेहमी नेहमी अशा गोष्टी लक्षात आणून द्या, असे कौतुकदेखील अजितदादांनी यावेळी केले आहे.