प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षात अमरावती-पुणे एक्स्प्रेसला मुदतवाढ; जाणून घ्या..
पुणे : मध्य रेल्वेने प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अमरावती ते पुणे द्विसाप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ जानेवारी २०२४ पर्यंत नियोजित असलेली गाडी क्रमांक ०१४४० अमरावती-पुणे एक्स्प्रेसला २ जानेवारी ते १ एप्रिल २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे १ जानेवारी ते १ एप्रिलपर्यंत ही रेल्वे धावणार असल्याने नवीन वर्षात पर्यटनासाठी पुणे जाणाऱ्यांना प्रवाशांना स्वस्तात प्रवास करता येणार आहे.
याबाबत अमरावती-पुणे एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्यात आली असून ही रेल्वेगाडी अमरावती येथून दर सोमवार आणि शनिवारी सायंकाळी ७:५० वाजता निघून वाशिम येथे रात्री १०:२९ वाजता पोहोचेल. दुसऱ्या दिवशी दुपारी ४:२० वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल.
त्यानंतर, ३१ डिसेंबरपर्यंत धावणार असणारी गाडी क्रमांक ०१४३९ पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेसला १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी दर शुक्रवार आणि रविवारी पुणे स्थानकावरून रात्री १०:५० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी १२:५४ वाजता वाशिम स्थानकावर पोहोचून १ मिनिटाच्या थांब्यानंतर अमरावतीकडे मार्गस्थ होऊन प्रस्थान स्थानकावर सायंकाळी ५:३० वाजता पोहोचेल.
पुणे-अमरावती-पुणे या द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसला मुदतवाढ मिळाल्याने वाशिमकर प्रवाशांची सोय होणार आहे. या रेल्वेला उरुळी, केडगाव, दौंड, जिन्ती रोड, जेऊर, कुर्डूवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा येथे थांबा असणार आहे.