अमित शहांच्या पुणे दौऱ्याने शहरात वाहतुकीचा मोठा पेच! कोणते रस्ते बंद, कुठे पार्किंगला बंदी? बाहेर पडण्याआधी ही यादी पाहा!


पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. आज रविवार आणि उद्या सोमवार असे दोन दिवस काही प्रमुख रस्त्यांवर वाहन पार्किंगला बंदी असणार आहे. तर सोमवारी सकाळपासून काही मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना घराबाहेर पडताना कोणत्या रस्त्याने जायचे आणि कुठे वाहन उभे करायचे, याची माहिती असणे महत्त्वाचे ठरणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे निर्बंध लागू करण्यात आले असून वाहतूक पोलिसांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

या प्रमुख रस्त्यांवर दोन्ही दिवस पार्किंगला बंदी

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील हवाई दलाचा तळ ते विमाननगर रस्ता, रामवाडी ते भारत फोर्ज कंपनी आणि मुंढवा परिसरातील रस्त्यांवर रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास मनाई असेल.

याशिवाय कोरेगाव पार्कमधील नॉर्थ मेन रोड, जहांगीर हॉस्पिटल चौक, अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, नेहरू मेमोरियल चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता अर्थात फर्ग्युसन रस्ता आणि वेधशाळेजवळील खुडे चौक येथेही पार्किंग करता येणार नाही.

संगमवाडी ते येरवड्यातील शाहदावलबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते गोल्फ क्लब रस्ता आणि ५०९ चौक ते लोहगाव येथील हवाई दलाचा तळ या मार्गांवरही वाहन उभे करण्यास बंदी असेल.

सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून हा रस्ता बंद

अमित शहा यांच्या उपस्थितीत सोमवारी सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून किराड चौक ते नेहरू मेमोरियल हॉल चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. या मार्गाने जाणाऱ्या वाहनचालकांनी किराड चौकातून जीपीओमार्गे हॉटेल ब्लू नाईल चौकात जावे आणि तेथून पुढे इच्छितस्थळी पोहोचावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टिळक रस्ता, बादशाही हॉटेल परिसरातही निर्बंध

सोमवारी सकाळी ९ वाजल्यानंतर कार्यक्रम संपेपर्यंत टिळक रस्ता, महाराष्ट्र साहित्य परिषद, बादशाही हॉटेल आणि भरत नाट्य मंदिर परिसरात वाहन पार्किंग करता येणार नाही. त्यामुळे या भागात येणाऱ्या नागरिकांनी पर्यायी व्यवस्था लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे.

जिल्हा परिषद परिसरात वाहतूक बंद; पार्किंगसाठी पर्याय जाहीर

पुणे जिल्हा परिषद परिसरात आयोजित कार्यक्रमामुळे दोराबजी मॉल ते हॉटेल ब्लू नाईल चौक हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या भागात येणाऱ्या वाहनचालकांसाठी एसजीएस मॉल, पूना क्लब, लेडीज क्लब, किराड चौक, पुणे पोलीस आयुक्तालय परिसरातील गल्ली, इस्कॉन मंदिर आणि ब्लू नाईल चौक येथे वाहने उभी करण्याचे पर्याय सुचवण्यात आले आहेत.

पुणेकरांसाठी पोलिसांचे आवाहन

अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवर सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी बंद असलेल्या मार्गांवर जाणे टाळावे, नो-पार्किंग निर्बंधांचे पालन करावे आणि वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांनुसार प्रवास करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!