पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी आता ड्रेसकोड? परदेशी भाविकांना पारंपरिक वेशभूषेची अट; मंदिर समितीचा मोठा प्रस्ताव!


सोलापूर : पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या परदेशी भाविकांसाठी आता वेगळे नियम लागू होण्याची शक्यता आहे. भारतीय संस्कृती आणि वारकरी परंपरेचा सन्मान राखण्यासाठी विदेशी भाविकांनी पारंपरिक वेशभूषेतच मंदिरात यावे, असा प्रस्ताव पुढे आला आहे. या निर्णयामुळे पंढरीत दर्शनासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या पोशाखाबाबत नवे नियम तयार होण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ड्रेसकोड नेमका कसा असेल आणि त्याची अंमलबजावणी कधी होणार, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

पंढरपूर हे देश-विदेशातील विठ्ठलभक्तांचे श्रद्धास्थान आहे. वर्षभर हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. आषाढी आणि कार्तिकी यात्रेच्या काळात तर पंढरीत भाविकांचा मोठा जनसागर उसळतो. यामध्ये परदेशातून येणाऱ्या भाविकांचीही संख्या असते. मंदिरातील धार्मिक वातावरण, भारतीय संस्कृती आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेला साजेशी वेशभूषा असावी, या भूमिकेतून हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

पुरुष आणि महिलांसाठी ड्रेसकोड कसा असेल?

प्रस्तावानुसार, परदेशी पुरुष आणि महिला भाविकांनी दर्शनासाठी येताना भारतीय पारंपरिक किंवा वारकरी संप्रदायाला अनुरूप पोशाख परिधान करणे अपेक्षित आहे. मात्र, पुरुषांनी नेमके कोणते कपडे घालावेत, महिलांसाठी कोणती वेशभूषा असेल, तसेच कोणत्या पोशाखांना परवानगी दिली जाईल, याबाबतचे निकष अद्याप ठरलेले नाहीत. त्यामुळे सध्या कोणत्याही विशिष्ट पोशाखाची अंतिम सक्ती जाहीर झालेली नाही.

जिल्हाधिकारी आणि वारकरी महाराज मंडळींचा ठराव

या विषयावर जिल्हाधिकारी आणि वारकरी महाराज मंडळींच्या सल्लागार परिषदेने विशेष ठराव मंजूर केला आहे. हा ठराव विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे पाठवण्यात आला आहे. त्यानंतर मंदिर समितीने या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी प्रमाणित कार्यपद्धती अर्थात एसओपी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मंदिर समितीच्या निर्णयाकडे लक्ष

परदेशी भाविकांना प्रवेश देताना कोणती प्रक्रिया असेल, वस्त्रसंहितेचे नियम कसे ठरवले जातील आणि त्यांची अंमलबजावणी कधीपासून होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मंदिर समितीची कार्यपद्धती तयार झाल्यानंतरच या प्रस्तावाचे अंतिम स्वरूप समोर येणार आहे. त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात परदेशी भाविकांसाठी ड्रेसकोड लागू होणार का, याकडे आता भाविकांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!