शिवाजी, शिवाजी असा उल्लेख करत अमित शहा यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख, गुन्हा दाखल होणार?

मुंबई : देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे भाषण ऐका, शिवाजी महाराज उल्लेख केलेला नाही. शिवाजी, शिवाजी, शिवाजी एकेरी उल्लेख, एरवी शिवाजी महाराज नाही म्हणालं तर याद राखा ते छत्रपती होते, ते छत्रपती होतेच, ते छत्रपती आहेत की नाही हे देशाच्या गृहमत्र्यांना माहित नाही, अशी जोरदार टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
शिवाजीने ओ किया ही भाषा आहे तुमची, महाराजांना आरे-तुरे करायला तुमची जीभ धजावते कशी? हा महाराजांना अपमान आहे. मुख्यमंत्र्यांनी एकेरी उल्लेख केल्याबद्दल गुन्हा दाखल केला पाहिजे. इतरांवर करता मग देशाच्या गृहमंत्र्यांना, गुजरातच्या नेत्यांना अभय आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
कुठे आहेत एसंशिं नकली हिंदुत्त्ववाले? ही मुभा सगळ्यांना आहे का, भीतरट लोकं आहेत हे, यांचं छत्रपती प्रेम हे ढोंगी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यामुळे वातावरण तापले आहे. अमित शहा काल रायगडच्या दौऱ्यावर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचे गृहमंत्री अमित शहा रायगडावर येऊन गेले.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेसह मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. अमित शहांच्या भाषणाचा धागा पकडत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शहांवर निशाणा साधला आहे. यामुळे आता यावर भाजपकडून काय उत्तर मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राऊत म्हणाले, छत्रपतींच्या महाराष्ट्रावरती औरंगजेबाप्रमाणे सूडाने कारवाया केल्या ते आम्हाला छत्रपतींवर ज्ञान देणार आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेले छत्रपतींचे वंशज आणि छत्रपतींचा जय करणारे लोक माना डोलावणार या राज्यावरती इतकी वाईट वेळ अद्याप आलेली नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.