आळंदी म्हातोबाचा मुलगा देशात चमकला! हर्षद शिंदेंचं एव्हिएशनमध्ये मोठं यश…

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबाची येथील हर्षद शांताराम शिंदे यांनी एव्हिएशन क्षेत्रात नेत्रदीपक यश संपादीत केले आहे. त्यामुळे त्यांचा अधिकृत ऑडिटर पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी तर्फे “सर्टिफाइड ऑडिटर” घडविण्यासाठी १३ दिवसांचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रशिक्षणामध्ये एव्हिएशन सिक्युरिटी नियम, जोखीम मूल्यांकन, ऑडिट पद्धती तसेच प्रात्यक्षिक अंमलबजावणी यांचा समावेश होता. प्रशिक्षणानंतर उमेदवारांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी १०० पैकी किमान ८० गुण मिळवणे आवश्यक होते. मार्च २०२६ मध्ये झालेल्या या प्रशिक्षणासाठी देशभरातून केवळ १५ उमेदवारांची निवड करण्यात आली होती.

त्यापैकी ११ उमेदवार यशस्वी ठरले. यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव हर्षद शिंदे यांनी १०० पैकी ८५ गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळवला. या यशामुळे त्यांचा अधिकृत ऑडिटर पॅनलमध्ये समावेश करण्यात आला असून, भविष्यात देशातील कोणत्याही विमानतळावर ऑडिटसाठी त्यांची नियुक्ती होऊ शकते. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
