पुणे-सोलापूर महामार्गावर थारचा थरार! भररात्री ट्रॅव्हल्स अडवली, काच-बोनेट फोडले; पुढे जे घडलं, ते पाहून जमाव संतापला!


पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर काळ्या रंगाच्या थारमधून आलेल्या दोघांनी दारूच्या नशेत खासगी प्रवासी बस अडवून धुडगूस घातल्याची घटना उरुळी कांचन येथे घडली. शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) रात्री साडेअकराच्या सुमारास तळवडी चौकात घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. बसची तोडफोड करून भररस्त्यात गोंधळ घालणाऱ्या दोघांना संतप्त नागरिकांनी चोप दिला. या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण पांडुरंग गुरव आणि संतोष चंद्रकांत बोराटे (दोघेही रा. नांदूर, ता. दौंड) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. ते एमएच १२ झेडडब्ल्यू ८३५५ क्रमांकाच्या थारमधून प्रवास करत होते. खासगी बसचालक अजय लहू काळे (वय २५, मूळ रा. वरपगाव, ता. आंबेजोगाई, जि. बीड) यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय काळे शुक्रवारी रात्री भोसरी येथून प्रवाशांना घेऊन आंबेजोगाईकडे जात होते. त्यांची ब्ल्यू नाईन कंपनीची ट्रॅव्हल्स बस (क्रमांक ओआर ११ सी २५२५) पुणे-सोलापूर महामार्गावरून जात असताना तळवडी चौकाजवळ पाठीमागून आलेल्या काळ्या थारने भरधाव वेगात बसच्या पुढे येत रस्ता अडवला.

यानंतर थारमधून उतरलेल्या दोघांनी दारूच्या नशेत असल्याचे फिर्यादीत नमूद असून, कुठल्यातरी हत्याराने बसच्या समोरील काच, दिवे, बोनेट आणि वायपरची तोडफोड केली. शिवीगाळ करत त्यांनी रस्त्यावर गोंधळ घातला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवासी घाबरले. हा धुडगूस पाहून परिसरातील नागरिक आणि रस्त्यावरून जाणारे वाहनचालक घटनास्थळी जमा झाले. संतापलेल्या नागरिकांनी दोघांना चोप दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेनंतर बसचालक अजय काळे यांच्या तक्रारीवरून उरुळी कांचन पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गाडेकर करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!