राज ठाकरेंनी डॉक्युमेंटरी डिलीट केली, पण लढा थांबणार नाही! ४८ लाख व्ह्यूज, पोलीस आयुक्तांची विनंती अन् अदानींच्या मुद्द्यावरून सरकारला थेट इशारा!

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या संबंधांवर भाष्य करणारी सबीर भाटिया यांची वादग्रस्त डॉक्युमेंटरी सोशल मीडियावरून हटवली आहे. मुंबई पोलिसांनी या चित्रफितीचे निर्माते आणि ती प्रसारित करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाची चर्चा वाढली होती. अखेर मुंबई पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून पोस्ट हटवत असल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट केले. मात्र, त्याचवेळी त्यांनी आपली भूमिका कायम ठेवत सरकारवर जोरदार टीका केली.

राज ठाकरे यांनी सांगितले की, डॉक्युमेंटरीला केवळ ट्विटरवर ४८ लाखांहून अधिक दृश्ये मिळाली, तर फेसबुकवरही तिला मोठा प्रतिसाद मिळाला. इतरांनी ती प्रसारित केल्यानंतर मिळालेल्या दृश्यांची मोजदाद वेगळी आहे. हा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश साध्य झाल्याने पोस्ट हटवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांबद्दल आदर असल्याने पोलीस आयुक्तांच्या विनंतीचा मान राखत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘माझा विरोध व्यक्तीला नाही, एकाधिकारशाहीला!’


देशातील अनेक उद्योगपती मोठे व्हावेत, रोजगार निर्माण व्हावा आणि देशाची आर्थिक प्रगती व्हावी, अशी अपेक्षा राज ठाकरेंनी व्यक्त केली. मात्र, केवळ एका उद्योगपतीचे हित जपले जात असेल आणि त्यातून देशाला धोका निर्माण होत असेल, तर त्याला विरोध राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
जानेवारी २०२६ मध्ये मुंबईतील शिवतीर्थावर झालेल्या सभेतही त्यांनी अदानी समूहाच्या वाढत्या प्रभावाबाबत सविस्तर सादरीकरण केले होते. त्या सादरीकरणातील काही दृश्यांचा सबीर भाटिया यांच्या डॉक्युमेंटरीत समावेश झाल्याचे त्यांनी सांगितले. जानेवारीतील आपली पोस्ट आणि सादरीकरणाचे व्हिडीओ अद्याप सोशल मीडियावर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भीमाशंकरच्या वनजमिनीवरून सरकारला घेरले
भीमाशंकर परिसरातील शेकडो हेक्टर वनजमीन गुजरातमधील टोरेंट कंपनीला देण्याच्या कथित प्रयत्नावरून राज ठाकरेंनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. महाराष्ट्रातील वनजमिनी ठरावीक उद्योगपतींच्या हितासाठी वापरल्या जात असल्याचा दावा करत त्यांनी मराठी खासदार, आमदार आणि मंत्र्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले.
“जी आग लागायची ती लागली आहे,” असे म्हणत त्यांनी आपला लढा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. डॉक्युमेंटरी हटवली असली, तरी एकाधिकारशाहीविरोधातील भूमिका मागे घेतलेली नाही, असा संदेश राज ठाकरेंनी दिला आहे.
