बारामतीच्या पेन्सिल चौकात दोन गटांचा राडा! तक्रारदारच मिळेना, अखेर पोलिसांनी उचलले मोठे पाऊल; १६ जणांवर गुन्हा


बारामती : शहरातील गजबजलेल्या पेन्सिल चौकात दोन गटांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रस्त्यावरच सुरू झालेल्या वादामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, या घटनेनंतर दोन्ही गटांपैकी कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे आले नाही. अखेर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत १६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पेन्सिल चौक परिसरात काही व्यक्तींमध्ये वाद सुरू झाला. पाहता पाहता या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. भर रस्त्यात दोन्ही गट आमनेसामने आल्याने परिसरात गोंधळ उडाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांची धावपळ झाली आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अंमलदार शहारुख शकिल शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, पोलीस हवालदार खारतोडे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल कदम यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधितांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली.

दोन्ही गटांची तक्रार देण्यास टाळाटाळ

या प्रकरणात दोन्ही बाजूंचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, एकमेकांविरोधात अधिकृत तक्रार देण्यास कोणीही तयार झाले नाही. त्यामुळे प्रकरणाकडे दुर्लक्ष न करता पोलिसांनी स्वतःहून कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. पोलीस अंमलदार शहारुख शेख यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्यानंतर १६ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

गुन्हा दाखल झालेल्या १६ जणांची नावे

गणेश शरद आटोळे, विनोद विठ्ठल आटोळे, अनिकेत प्रमोद बेंगारे, विकास अशोक आटोळे, तुषार बंडू आटोळे, आदेश ज्योतीराम आटोळे, धनाजी संपत आटोळे, स्वप्निल शिवलाल आटोळे, अभिमान अंबुदास लांडगे, समाधान शशिकांत भिसे, सुशांत बाळू मोहिते, प्रितम अंकुश कुचेकर, मनोज सुहास बागाव, निखील शिवलाल आटोळे, सोहम राजू लोंढे आणि आदित्य अतुल भिसे, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण सावळ, ता. बारामती, जि. पुणे येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १९४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार टिळेकर यांनी केली असून, पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रदीप काळे पुढील तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!