नगरपरिषद निवडणुकाबाबत अजित पवारांच मोठं विधान ; महायुती एकत्रित लढावी ही आमची इच्छा…

पुणे : तब्बल पाच वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त लागला आहे.राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. ही निवडणूक ईव्हीएमवर घेण्यात येणार आहे. या निवडणुकीबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केलं आहे. या निवडणुकीत महायुती म्हणून आम्ही एकत्रित जनतेपुढे जावे अशी आमची इच्छा आहे असं त्यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, निवडणुका लढण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे,भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण शिवसेनेचे उदय सामंत इत्यादी लोक एकत्र बसतील आणि चर्चा करतील,सगळ्यांनी एकत्रित लोकांपुढे गेले पाहिजे असं आमचं मत आहे. पण आघाडी सरकार असताना आम्ही स्वतंत्र लढत होतो स्वतंत्र लढल्यावर मतांची विभागणी होते. फायदा होणार असेल तर एकत्रितपणे लढले पाहिजे.आता निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक पक्ष तयारी करत आहे. जेथे ज्या पक्षाची ताकद अधिक असेल त्यांनी इतर मित्र पक्षांना सन्मानपूर्वक जागा दिल्या तर फारसा प्रश्न उरत नाही असे सांगून पवार यांनी प्रत्येकाला आपली ताकद आजमावण्याचा अधिकार आहे असं सांगितलं.

आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. दरम्यान माजी मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेवर देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पलटवार केला आहे. विनाशकाली विपरीत बुद्धी,आम्हाला यावर काही बोलायचं नाही, आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रात राजकारण करतो. दुसऱ्यांनी वेडेपणा केला, बेबाबदार आरोप केला म्हणून उत्तर देत बसत नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.

