अजित पवारांचं ‘लाडकी बहीण’ योजनेवर मोठं विधान, आता १५०० रुपये सुद्धा मिळणार नाहीत? वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ…

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
आतापर्यंत एकूण नऊ हफ्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. मात्र या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचं बोललं जात आहे. तर विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आलो तर लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ असे आश्वासनही महायुतीच्या नेत्यांनी दिल होते.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमधील एका कार्यक्रमात या योजनेवर सूचक वक्तव्य केलं आहे, जे सध्या चर्चेचा विषय बनले आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये महायुती सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती.
त्यानंतर आजवर नऊ हप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. मात्र सरकार स्थापन होऊन आता चार महिने उलटले तरीही वाढीव रकमेचा निर्णय अद्याप झालेला नाही.
सध्या आपण महिलांना दरमहा १५०० रुपये देत आहोत. पण परिस्थिती सुधारली की त्यावर पुढचा विचार केला जाईल, असे सूचक विधान अजित पवारांनी केलं. मात्र ‘परिस्थिती सुधारली की’ हे नेमकं कधी, आणि २१०० रुपये कधीपासून देण्यात येणार, यावर त्यांनी मौन बाळगले. त्यामुळे सरकारने दिलेले आश्वासन केवळ निवडणुकीपुरतं होतं का, असा प्रश्न आता लाभार्थी महिलांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वांना पडला आहे.
दरम्यान, राज्याच्या नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेतील वाढीव रकमेबाबत कोणतीही ठोस घोषणा झाली नाही. त्यामुळे योजनेच्या भविष्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “महिलांचे आश्वासन फसवे ठरतेय, अशी जोरदार टीका सध्या सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे.
सरकारमधील मंत्र्यांनी ही योजना बंद होणार नसल्याचं सांगितले असले तरी २१०० रुपयांची घोषणा कधी अमलात येईल, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. सरकारकडून फक्त “लवकरच निर्णय होईल” अशी आश्वासनं मिळत आहेत. मात्र तो “लवकरच” केव्हा येणार याचं उत्तर अद्याप गुलदस्त्यातच आहे.