अयोध्या दौऱ्यावरून अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले, “मला देखील जायचं आहे पण….

मुंबई : शिवसेना नाव आणि धनुष्यचिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहे. 9 एप्रिलला अयोध्येचा दौरा ठरला आहे. या दौऱ्यादरम्यानच साधू, संत आणि महंतांकडून मुख्यमंत्री शिंदे हे शिवधनुष्य स्विकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
या आयोध्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री शरयू नदीच्या काठी काही धार्मिक विधींमध्ये सहभाग घेणार आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच अयोध्येला जाणार आहेत. याआधी ते राजकीय बंडखोरी करण्याआधी आदित्य ठाकरे यांच्या सोबत आयोध्या दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता यावरच अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “मला कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत त्याचबरोबर गुजरातपासून पश्चिम बंगालपर्यंत सर्व ठिकाणी जायचं आहे. मात्र माझ्याकडे काम घेऊन येणाऱ्या लोकांची गर्दी इतकी जास्त असते की मला ते शक्य होत नाही. असं म्हणत अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.