Ajit Pawar : अजित पवारांची आमदार अशोक पवार यांच्यावर जोरदार टीका, म्हणाले, अरे हो बाबा चूक..
Ajit Pawar : मांडवगण फराटा (ता. शिरूर) तुमच्या आमदाराने खासगी कारखाना व्यवस्थित चालवला, पण तुमच्या हक्काच्या कारखान्याची माती केली. तुम्ही म्हणाल, आता काय बोलताय, आधी मतं तुम्हीच द्यायला लावली. मला काय माहीत हा दिवटा असा उजेड पाडेल, अशा शब्दांत अजित पवारांनी अशोक पवारांची खिल्ली उडवली आहे.
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते. या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदार अशोक पवारांचा समाचार घेत घोडगंगा कारखाना चालवायला जमत नसेल तर नवीन संचालक मंडळ आणू किंवा प्रशासकाची नेमणूक करू, शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून लवकरच घोडगंगा कारखाना संकटातून बाहेर काढणार, असे म्हणत अशोक पवार वेडवाकडं चालत असल्याची टीका अजित पवारांनी केली आहे. Ajit Pawar
ते म्हणाले, आपल्या भागात पिकवलेला ऊस आपल्याच कारखान्यात जावा, अशी अपेक्षा असते. आता तुमचा ऊस लगतच्या भागातील कारखान्यात जातोय. त्यांचा काटा चांगला आहे. मात्र, ऊस देताना काटा नक्की चेक करा, बरेच कारखानदार काटा मारतात. आपण कष्टाने, घाम गाळून पिकवलेला ऊस आहे. त्यात आपली फसवणूकहोणार नाही, यासाठी काटा तपासत चला, असा सल्ला अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिला.
फळबाग, भाजीपाला अशी विविध प्रकारची शेती मी करतो. वेळ मिळेल तेव्हा शेतात जातो. मात्र, कामाच्या व्यापामुळे सध्य मला शेतीकडे वेळ देता येत नाही. परंतु शेतकऱ्यांच्या समस्या मला समजलेल्या आहेत, त्या मी नक्की सोडवणार, असे अजित पवार म्हणाले आहे.