अजितदादाही पडले चांडाळ चौकडीच्या कलाकारांच्या प्रेमात, सुप्रियाताईंच्या सोबत पाहिला भाग…!

बारामती : सध्या बारामती तालुक्यातील कलाकारांनी तयार केलेली वेब सिरीज म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती सर्वत्र गाजत आहे. या ग्रामीण भागावर आधारित असलेल्या वेबसिरीजला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दर रविवारी याचा भाग येत असतो.
यामध्ये बाळासाहेब, रामभाऊ, गणा पैलवान, सुभाषराव, छोट्या, सरपंच नेवशे, संजूशेठ हे कलाकार खूपच चर्चेत असतात. त्यांच्या विनोदी स्वभावाचे अनेकजण चाहते आहेत. आता खुद्द विरोधी पक्षनेते अजित पवार हे देखील त्यांचे चाहते झाले आहेत.
अजित पवार देखील त्यांचा एक भाग बघत असलेला विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी सुप्रिया सुळे, प्रतापराव पवार देखील उपस्थित होत्या. यामुळे आता ही वेबसिरीज किती प्रसिद्ध झाली आहे, याचा अंदाज आपल्याला येईल.
दरम्यान, यामध्ये ग्रामीण भागातील लोकांच्या दैनंदिन जीवनातील कथा दाखवल्या जातात. तसेच गाव पातळीवरील राजकारण, समाजकारण, तसेच समाज उपयोगी भाग दाखवले जातात. यामुळे कमी वेळेतच ही वेबसिरीज लोकांच्या मनात घर करून बसली आहे.