कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके भारतात दाखल; दिल्लीतून मोठ्या आंदोलनाची हाक..


नवी दिल्ली : ‘कॉकरोच जनता पार्टी’ या अनोख्या संघटनेची स्थापना करणारे आणि सोशल मीडियावरील उपरोधिक शैलीमुळे चर्चेत असलेले अभिजित दिपके भारतात परतले आहेत. 6 जून रोजी नवी दिल्ली येथे त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या निषेध सभेचे आयोजन करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

बोस्टन (अमेरिका) येथून मायदेशी परतलेल्या अभिजित दिपके आणि त्यांच्या समर्थकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी विमानतळावरील टर्मिनल-3 परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. दरम्यान, त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेरही पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

वाढत्या चर्चेमुळे आणि संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर अभिजित दिपके यांच्या कुटुंबीयांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपले घर तात्पुरते सोडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे वडील भगवानराव दिपके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना कोणतीही थेट धमकी मिळालेली नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव कुटुंबाने तात्पुरते दुसरीकडे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

भगवानराव दिपके यांनी सुरुवातीला मुलाला या आंदोलनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, अभिजित यांच्या ठाम भूमिकेमुळे त्यांनी त्यांचा निर्णय स्वीकारल्याचेही त्यांनी नमूद केले.

या आंदोलनाला कायदेशीर पाठबळ मिळावे यासाठी अभिजित दिपके यांनी ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांची मदत घेतली आहे. अॅड. सरोदे यांनी स्पष्ट केले की, दिपके यांचा कोणताही नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा हेतू नसून ते लोकशाही आणि सनदशीर मार्गाने जनआंदोलन उभारत आहेत.

या सभेसाठी शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक, अभिनेते प्रकाश राज, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांसारख्या मान्यवरांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र, मुलाच्या वाढत्या सामाजिक-राजकीय सक्रियतेमुळे त्यांची आई अनिता दिपके चिंतेत असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेतील यशस्वी करिअरवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तो आंदोलनांच्या मार्गावर वळल्याने त्यांना काळजी वाटत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

आता सर्वांच्या नजरा दिल्लीतील या सभेकडे लागल्या असून, या आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो आणि त्याचे पुढील राजकीय-सामाजिक परिणाम काय होतात, याकडे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!