पुण्यात म्हाडाचं घर घेण्याची सुवर्णसंधी! अर्जासाठी किती रक्कम भरावी लागणार? कोणती कागदपत्रे लागणार? जाणून घ्या


पुणे : पुणे आणि परिसरात स्वतःचे घर घेण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाकडून मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई-पुणे महामार्गालगत ताथवडे येथील 634 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, इच्छुकांनी अर्ज करण्यापूर्वी अनामत रक्कम, अर्ज शुल्क आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. म्हाडाने अधिकृत संकेतस्थळावर योजनेची सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली असून, पात्र नागरिकांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

म्हाडा पुणे मंडळाने अत्यल्प उत्पन्न गट (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन्न गट (MIG) आणि उच्च उत्पन्न गट (HIG) यांच्यासाठी गृहनिर्माण योजना जाहीर केली आहे. मात्र, या सोडतीतील 634 सदनिकांचा मोठा हिस्सा अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी राखीव आहे. या प्रकल्पामध्ये 1BHK आणि 2BHK स्वरूपातील घरे उपलब्ध असून, मुंबई-पुणे महामार्गालगतच्या ताथवडे परिसरात ही योजना राबविण्यात येत आहे.

अर्ज शुल्क आणि अनामत रक्कम किती?

अल्प उत्पन्न गटातील (LIG) अर्जदारांना 50 हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे. याशिवाय 600 रुपये अर्ज शुल्क आणि 108 रुपये जीएसटी, असे एकूण 708 रुपये स्वतंत्र भरावे लागतील. त्यामुळे या गटातील अर्जदारांना अर्ज करताना एकूण 50,708 रुपये भरावे लागतील.

मध्यम उत्पन्न गटातील (MIG) अर्जदारांसाठी 75 हजार रुपयांची अनामत रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यासोबत अर्ज शुल्क आणि जीएसटी मिळून 708 रुपये भरावे लागतील. त्यामुळे या गटातील अर्जदारांना 75,708 रुपये जमा करावे लागतील. म्हाडाने स्पष्ट केले आहे की, अर्ज शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही.

अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी काही महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचा रद्द केलेला धनादेश किंवा पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, 50 केबीपर्यंतचा पासपोर्ट आकाराचा फोटो, व्हॉट्सअॅप क्रमांकासह कार्यरत मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.

याशिवाय 2018 नंतर जारी केलेले अधिवास प्रमाणपत्र आणि वयाचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे. अर्जामधील माहिती आणि कागदपत्रे योग्य असल्याची खात्री करूनच अर्ज सादर करावा, असे म्हाडाने स्पष्ट केले आहे.

योजनेची माहिती कुठे मिळेल?

सदनिकांची संख्या, किंमत, पात्रतेचे निकष, उत्पन्न मर्यादा, अटी व शर्ती यासह सर्व माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि माहिती पुस्तिकेमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेतील नियम, अटी किंवा सदनिकांच्या संख्येत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार मुख्य अधिकारी, म्हाडा पुणे मंडळ यांच्याकडे राखीव असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

म्हाडाने इच्छुक नागरिकांना शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रे तयार करून लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ताथवडेसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या परिसरात घर मिळवण्याची ही मोठी संधी असल्याने या योजनेला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!