‘चाणक्य’ म्हणवून घेता, मग जबाबदारी घ्या! अमित शाहांच्या राजीनाम्याची अभिजीत दीपकेंची मागणी; भाजप, दिल्ली पोलिसांवरही गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर : कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्र सरकार, भाजप आणि दिल्ली पोलिसांवर जोरदार टीका करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनानंतर प्रथमच माध्यमांसमोर सविस्तर भूमिका मांडताना त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली, भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चांवर स्पष्ट भूमिका घेतली, तर आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या या वक्तव्यांमुळे राष्ट्रीय राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना दीपके म्हणाले की, दिल्लीतील आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित कारवाईची संपूर्ण जबाबदारी केंद्रीय गृहमंत्रालयाची आहे. कॉकरोच जनता पार्टीला परदेशातून निधी मिळत असल्याचे आरोप वारंवार केले जात असताना, देशाचे गृहमंत्री म्हणून अशी बाब घडत असेल तर ती रोखण्यात अपयश आल्याची जबाबदारी अमित शाह यांनी स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी म्हटले. “स्वतःला राजकारणातील ‘चाणक्य’ म्हणवून घेणाऱ्यांनी आधी देशाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडली पाहिजे. जर बाहेरून निधी येत असेल, तर ते तुमचंच अपयश आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्या,” असा थेट टोला त्यांनी लगावला.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयावर टीका करताना दीपके यांनी विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराच्या मुद्द्यावर सरकारवर निशाणा साधला. त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचे नाव घेत सरकारच्या निर्णयक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले. “विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या लोकांना महत्त्व दिले जात आहे. सरकारकडे सक्षम नेतृत्वाची कमतरता दिसून येते,” असे ते म्हणाले.


यावेळी त्यांनी तरुण पिढीची बाजूही ठामपणे मांडली. सोशल मीडियावर जेन-झी पिढीला ट्रोल करण्याची सध्या फॅशन झाली असली, तरी हीच पिढी भविष्यात देशाचे नेतृत्व करणार असल्याचे त्यांनी सांगितले. “ही मुलं मोठ्या घरातील नाहीत, तर सामान्य कुटुंबातून आलेली आहेत. त्यांच्या आवाजाला दाबण्याऐवजी त्यांचे प्रश्न समजून घेणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देत दीपके यांनी शेतकरी संघटनांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. “मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमची भूमिका कायम स्पष्ट राहील. गरज पडेल तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपमध्ये प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. “मला कितीही ऑफर आल्या तरी मी भाजपमध्ये जाणार नाही. काही लोकांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा अनुभव मला आला आहे. मात्र माझी भूमिका बदलणार नाही,” असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी 2014 नंतर देशातील बेरोजगारी, महागाई आणि शेतकरी प्रश्न यांसारखे मूलभूत विषय चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर बोलताना दीपके यांनी आंदोलनावेळी प्रत्येक हालचालीचे चित्रीकरण होत असल्याचा उल्लेख केला. पोलिसांनी संविधानाच्या चौकटीत राहून काम केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी आंदोलनापूर्वीच परिसरात दगडांनी भरलेला ट्रक आणण्यात आल्याचा दावा केला. तसेच विद्यार्थ्यांवर हिंसाचाराचा ठपका ठेवण्यासाठी काही गोष्टींचे पूर्वनियोजन करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या दाव्यांमुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.