Abdul Sattar : पुणे बाजार समितीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा मी उघड केला, पणनमंत्री अब्दुल सत्तार यांचा गौप्यस्फोट

Abdul Sattar : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कोट्यवधींचा घोटाळा मी स्वतः उघड केला आहे. त्यामुळे याबाबतची चौकशी गुंडाळण्याचा अथवा आजी-माजी संचालकांना संरक्षण देण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगत संचालक मंडळावर कारवाई होणार असल्याचा पुनरुच्चार पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. त्यामुळे आजी-माजी संचालकांचे धाबे दणाणले आहेत.
पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे पणन मंडळाच्या वतीने मिलेट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री सत्तार आले होते. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
अब्दुल सत्तार म्हणाले की, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील ५ ते ६ संचालकांच्या बाबतीत मुलाणी समितीने जो निर्णय दिला होता, त्याबद्दल संचालकांना मी अपात्र ठरविले आहे. याबाबतीतील पुढील निर्णय सरकार घेणार आहे. Abdul Sattar
मी भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण देण्याचे काम करीत नाही. जी सत्य परिस्थिती होती, त्यावर आधारितच निर्णय दिला आहे. जिल्हा उपनिबंधकांना ६० दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, ९० दिवस होऊनही त्यांनी निर्णय दिला नाही. त्यामुळे ही चौकशी गुंडाळली असल्याची चर्चा बाजार समिती आणि पणनच्या वर्तुळात सुरू आहे.
याबाबत सत्तार म्हणाले, ही चौकशी गुंडाळली असती तर मी गुंडाळल्यासारखा निर्णय दिला असता, पुणे बाजार समितीमध्ये जे जे चुकीची कामे करतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. संचालकांना मी संरक्षण दिले असते तर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सिद्धच झाला नसता. निर्णय देताना मलाही अनेक अडचणी आल्या. मात्र, सत्य बोलावे लागते, सत्य करावे लागते या युक्तीप्रमाणे मी जे सत्य आहे ते केले, असेही सत्तार म्हणाले आहे.
….तर त्यांच्यावर कारवाई
मी जो निर्णय दिला आहे, तो तपासून घ्या, असे सांगत मुलाणी समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास तसेच दिरंगाई केल्यास जिल्हा उपनिबंधकांवरही कारवाई करण्याचा इशाराच राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.