मध्यरात्रीचा प्रवास ठरला अखेरचा! पुण्यात पोलो कारची ट्रकला भीषण धडक; तीन मित्रांचा जागीच मृत्यू, दोघांची मृत्यूशी झुंज

पुणे : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाघोलीजवळील कटकेवाडीत मध्यरात्री काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. वोक्सवॅगन पोलो कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. रविवारी रात्री एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. ओमकार सूर्यवंशी, शंकर ढोळे आणि मयूर औटी अशी मृत तरुणांची नावे असून आशुतोष मरकड आणि प्रणय शिंदे हे दोघे जखमी आहेत. या घटनेने मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचही तरुण वोक्सवॅगन पोलो कारमधून पुणे-अहिल्यानगर महामार्गावरून जात होते. कटकेवाडीजवळ कार आणि ट्रकची जोरदार धडक झाली. धडकेचा जोर इतका मोठा होता की कारमधील सर्व पाच जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

रुग्णालयात पोहोचताच तिघांना मृत घोषित

वाघोली येथील आय मॅक्स रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ओमकार सूर्यवंशी, शंकर ढोळे आणि मयूर औटी यांना मृत घोषित केले. आशुतोष मरकड आणि प्रणय शिंदे यांच्यावर उपचार सुरू असून दोघेही शुद्धीवर असल्याची माहिती आहे. एकाच अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने वाघोली परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे.

