स्वारगेटमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; कोर्टात सुनावणी सुरू होताच पीडिता ढसाढसा रडली, पुढे काय घडलं?


पुणे : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या खटल्याला अखेर सुरुवात झाली आहे. शनिवारी (दि. २१ नोव्हेंबर) न्यायालयात पीडित तरुणीची साक्ष नोंदवण्यास सुरुवात झाली. मात्र, घटनेचा घटनाक्रम सांगताना पीडितेला अश्रू अनावर झाले. तिची मानसिक स्थिती अस्वस्थ झाल्याने न्यायालयाने पहिल्या दिवसाचे कामकाज तहकूब केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ डिसेंबर रोजी होणार आहे.

नेमकी घटना काय?

ही घटना २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकात घडली होती. साताऱ्याला जाणारी बस कुठे लागते, अशी विचारणा करण्याच्या बहाण्याने आरोपीने २६ वर्षीय तरुणीची दिशाभूल केली. त्यानंतर तिला बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली होती.

या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला पोलिसांनी २८ फेब्रुवारी २०२५ रोजी शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली होती. एप्रिल २०२५ मध्ये पोलिसांनी न्यायालयात सुमारे ८९३ पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर जून २०२६ मध्ये न्यायालयाने आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित केले. सरकारी पक्षाने ८७ साक्षीदारांची यादी आणि पुरावे न्यायालयात सादर केले आहेत.

शनिवारपासून जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. देशमुख यांच्या न्यायालयात या खटल्याचे कामकाज सुरू झाले. पहिल्याच दिवशी पीडितेची साक्ष नोंदवण्यात येत होती. मात्र, घटनेचा घटनाक्रम सांगताना तिला रडू कोसळले. त्यामुळे न्यायालयाने तिला सावरण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी काही वेळ विश्रांती दिली.

विश्रांतीनंतरही पीडितेची मानसिक स्थिती अस्वस्थ असल्याने न्यायालयाने शनिवारचे कामकाज तहकूब करण्याचा निर्णय घेतला. या खटल्याचे कामकाज प्रभावीपणे चालवण्यासाठी राज्य शासनाने ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ डिसेंबर रोजी होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!