रोहित पवारांना स्वकीयांचाच ‘राजकीय धक्का’? मोर्चाआधीच कार्यकर्त्यांना थांबवण्याचा आदेश; आता तुतारीलाही सोडचिठ्ठी?

नागपूर : आमदार रोहित पवार यांनी शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी नागपूरमध्ये ‘न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा’ काढण्याची तयारी केली असतानाच त्यांच्या स्वतःच्याच पक्षातून वेगळे संकेत मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. रोहित पवारांच्या आंदोलनाला विदर्भातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहू नये, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मोर्चापूर्वीच पक्षांतर्गत राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रोहित पवार यांनी रविवारी नागपूरमध्ये विदर्भातील ग्रामीण आणि शहर जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शेगाव येथून सुरू होणारा ट्रॅक्टर मोर्चा बुटीबोरीमार्गे नागपूरमधील विधान भवनावर नेण्याचे नियोजन आहे. मात्र, या बैठकीनंतर पक्षातील वरिष्ठ नेत्याकडून जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांना स्वतंत्र निरोप देण्यात आल्याचे समजते. प्रदेश कार्यालयाकडून येणाऱ्या सूचनांचेच पालन करावे आणि रोहित पवार यांच्या आंदोलनात सहभागी होऊ नये, असे कार्यकर्त्यांना सांगण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

या घडामोडींमागे पक्षाच्या संभाव्य राजकीय भूमिकेचा संदर्भ असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष केंद्र आणि राज्यातील सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, रोहित पवार यांनी सत्तेत जाण्याच्या भूमिकेला विरोध दर्शवला असून, असा निर्णय झाल्यास पर्यायी मार्ग निवडण्याचे संकेत दिल्याचे सांगितले जाते. याच भूमिकेमुळे त्यांना पक्षात डावलले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, याबाबत पक्षाकडून अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही.

तुतारी चिन्ह बाजूला ठेवून आंदोलन?

४ डिसेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथून रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, हा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ‘तुतारी’ चिन्हाखाली निघणार नसल्याची माहिती समोर आली आहे. पक्षांतर्गत अडथळ्यांच्या चर्चेमुळे हा निर्णय घेतल्याचे बोलले जात असले, तरी मोर्चा काढण्यावर रोहित पवार ठाम आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम असल्याची चर्चा आहे.
९ डिसेंबर रोजी मोर्चा विधान भवनावर धडकणार असून, गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत, मायक्रोफायनान्स कर्जवसुलीला दोन वर्षांची सरसकट स्थगिती, स्वतंत्र रोजगार हमी योजना आणि मच्छीमारांना सरकारी आर्थिक मदत या प्रमुख मागण्या मांडल्या जाणार आहेत. शेतकरी आणि शेतमजुरांच्या अन्य प्रश्नांचाही यात समावेश आहे.
या आंदोलनाला शरद पवार यांचे मार्गदर्शन असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले होते. काँग्रेस तसेच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशीही मोर्चात सहभागी होण्याबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता पक्षातील कथित विरोध झुगारून रोहित पवार मोर्चा किती ताकदीने काढतात आणि त्यांना कोणाची साथ मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
