राष्ट्रवादीत भूकंपाची चाहूल! अजितदादांच्या पक्षातील २२ आमदार बंडाच्या तयारीत? शरद पवारांच्या भेटीसाठी मागितला वेळ; संजय राऊतांच्या गौप्यस्फोटाने राजकारण तापलं!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावरून राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच आता पक्षात आणखी एका मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रवादीतील तब्बल २० ते २२ आमदार पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. विशेष म्हणजे, याच गटातील काही आमदारांनी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा मोठी फूट पडणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या संभाव्य बंडामागील कारणांवरही भाष्य केले. त्यांच्या मते, अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत काही आमदारांना आपला स्वाभिमान जपणे कठीण जात असल्याची भावना आहे. त्यामुळे हे आमदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा मूळ पक्षात परतण्याचा विचार करत असल्याचा दावा त्यांनी केला.
विलीनीकरण नाही, तर आमदारांची घरवापसी?

राऊत यांनी या संभाव्य घडामोडीला विलीनीकरणाचे स्वरूप देण्यासही नकार दिला. संबंधित आमदार एकतर शरद पवारांच्या गटात परततील किंवा आगामी निवडणुकीच्या आधी अन्य पक्षाचा पर्याय स्वीकारतील, असे त्यांनी म्हटले. ‘अमित शाहांनी निर्माण केलेला हा पक्ष पुन्हा एकदा फुटेल,’ अशा शब्दांत त्यांनी सत्ताधारी भाजपवरही निशाणा साधला.

फडणवीसांच्या भूमिकेवरूनही राजकीय संघर्ष
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय होणार नसल्याचे म्हटले होते. यावर राऊत यांनी आक्षेप घेतला. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाबाबत भाजप आपली भूमिका मांडू शकतो; मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या राजकीय निर्णयांमध्ये भाजप हस्तक्षेप करू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सिल्व्हर ओकवरील भेटीगाठी वाढल्या
दरम्यान, बुधवारी शरद पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार गटातील काही आमदारांनी वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी पंकज भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही शरद पवारांची भेट घेतली होती. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील नेत्यांच्या भेटीगाठींमुळे विलीनीकरणाच्या चर्चांनाही पुन्हा जोर आला आहे.
सध्या शरद पवार मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी असून पुढील काही दिवस ते विश्रांती घेणार असल्याची माहिती पवार कुटुंबीयांनी दिली आहे. त्यामुळे आमदारांची भेट नेमकी कधी होते आणि त्यातून काय राजकीय संदेश बाहेर येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मात्र, २० ते २२ आमदार पक्ष सोडणार असल्याचा दावा अद्याप संजय राऊत यांच्याकडूनच करण्यात आला असून संबंधित आमदारांनी याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार की अजित पवारांच्या पक्षातच नवे बंड उभे राहणार, याचे उत्तर आगामी घडामोडींमधून स्पष्ट होणार आहे.
