अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासात नवा ट्विस्ट! रोहित पवारांच्या आरोपांदरम्यान १४ महिन्यांचा विमानप्रवासाचा हिशेब समोर; १०४ पैकी ८५ वेळा VSRलाच पसंती, नेमकं काय दडलंय?

मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघाताभोवती निर्माण झालेलं संशयाचं वातावरण अद्याप कायम असतानाच आता त्यांच्या विमान प्रवासाशी संबंधित महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. अपघातासाठी वापरलेल्या व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीवर आमदार रोहित पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. कंपनीचे मालक व्ही. के. सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. मात्र, आता समोर आलेल्या कागदपत्रांनुसार अजित पवार स्वतः अनेकदा याच कंपनीच्या विमानांना पसंती देत असल्याचे दिसून आले आहे.
१४ महिन्यांचा प्रवासाचा हिशेब काय सांगतो?


८ डिसेंबर २०२४ ते २८ जानेवारी २०२६ या सुमारे १४ महिन्यांच्या कालावधीत अजित पवार यांनी एकूण १०४ वेळा चार्टर विमानातून प्रवास केल्याची नोंद आहे. त्यापैकी तब्बल ८५ प्रवास व्हीएसआर व्हेंचर्सच्या विमानांतून झाले. उर्वरित १९ वेळा त्यांनी अन्य कंपन्यांच्या विमानांचा पर्याय निवडला. म्हणजेच त्यांच्या एकूण विमान प्रवासांपैकी जवळपास ८२ ते ८३ टक्के प्रवास व्हीएसआरच्या विमानांतून झाले होते. या विमानांमधून त्यांनी महाराष्ट्रासह देशातील विविध ठिकाणी प्रवास केल्याचे कागदपत्रांमधून समोर आले आहे.

फक्त अजित पवारच नव्हे, पवार कुटुंबातील इतर सदस्यांचाही प्रवास

या माहितीतील आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे व्हीएसआर कंपनीच्या विमानांचा वापर पवार कुटुंबातील इतर सदस्यांनीही केला होता. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यांनीही या कंपनीच्या विमानांतून प्रवास केल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. शरद पवार यांनी मुंबई-दिल्ली प्रवासासाठी अनेकदा व्हीएसआरच्या विमानांचा वापर केल्याची माहितीही समोर आली आहे.
रोहित पवारांचे आरोप नेमके काय होते?
२८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळावर झालेल्या दुर्घटनेनंतर रोहित पवार यांनी विमान अपघातातील घटनाक्रम आणि व्हीएसआर कंपनीच्या सेवेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले. कंपनीच्या विमान सेवेत त्रुटी असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी मालक व्ही. के. सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यासाठी त्यांनी मुंबई आणि बारामती येथील पोलीस ठाण्यांमध्येही पाठपुरावा केला. १६ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कंपनीला संरक्षण देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. मात्र, फडणवीस यांचा अपघाताशी थेट संबंध असल्याचा आरोप आपण करत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
अपघातातील विमान कोणते होते?
बारामती विमानतळावर २८ जानेवारी २०२६ रोजी व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीच्या बॉम्बार्डियर लिअरजेट ४५ या विमानाचा (व्हीटी-एसएसके) अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर विमानाची सुरक्षितता, तांत्रिक बाबी आणि कंपनीच्या जबाबदारीबाबत प्रश्न उपस्थित झाले.
आता अजित पवार यांच्या १४ महिन्यांतील विमान प्रवासाचा तपशील समोर आल्याने चर्चेला नवा मुद्दा मिळाला आहे. मात्र, व्हीएसआरच्या विमानांना त्यांनी वारंवार पसंती दिली होती, एवढ्यावरून अपघातातील तांत्रिक त्रुटी किंवा रोहित पवारांचे आरोप चुकीचे ठरत नाहीत. प्रवासाची आकडेवारी आणि अपघातासंदर्भातील प्रश्न या स्वतंत्र बाबी आहेत. त्यामुळे या दुर्घटनेच्या तपासातून नेमके काय निष्पन्न होते, याकडे राजकीय वर्तुळासह राज्याचे लक्ष लागले आहे.
