एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! ऑपरेशन टायगरच्या आधीच भाजपची मोठी खेळी, शिंदे गटाच्या माजी आमदाराचा पक्षप्रवेश


मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोसह ‘वेट अँड वॉच 3.0’ असे लिहिलेले पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या पोस्टरमुळे शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता भाजपने शिंदे गटाला पालघरमध्ये मोठा धक्का दिला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

श्रीनिवास वनगा यांनी सोडला धनुष्यबाण, हाती घेतले कमळ

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने पालघर दौऱ्यावर असताना श्रीनिवास वनगा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०२४ पासूनच ते शिवसेना शिंदे गटावर नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी शिंदे गटाची साथ सोडत भाजपमध्ये पुनरागमन केले. या पक्षप्रवेशामुळे पालघर जिल्ह्यात शिंदे गटाला राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.

‘कार्यकर्ते आणि परिवाराची स्वगृही परतण्याची इच्छा होती’

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर श्रीनिवास वनगा यांनी आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली. काही वर्षांपूर्वीच्या राजकीय घडामोडींमुळे आपण भरकटलो होतो. मात्र, कार्यकर्ते आणि कुटुंबीयांची पुन्हा स्वगृही परतण्याची इच्छा होती, असे त्यांनी सांगितले.

माजी खासदार चिंतामण वनगा आज हयात असते, तर आपल्या या निर्णयामुळे त्यांना आनंद झाला असता, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. कोणत्याही पदाची अपेक्षा नसून सामान्य कार्यकर्ता म्हणून भाजपसाठी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पालघरमध्ये भाजपची ताकद वाढणार?

यावेळी श्रीनिवास वनगा यांनी खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्या कामाचे कौतुक केले. भाजपच्या माध्यमातून पालघरमधील विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, श्रीनिवास वनगा यांच्या भाजप प्रवेशामुळे पालघर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, शिंदे गटासाठी हा पक्षप्रवेश महत्त्वाचा राजकीय धक्का मानला जात आहे. त्यामुळे आगामी काळात पालघरमधील राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!