लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पुन्हा सुरू झाली? महिलांनो, कोणतीही लिंक उघडण्यापूर्वी हे जाणून घ्या

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रियेमुळे योजनेचा लाभ बंद झालेल्या महिलांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. ई-केवायसी पूर्ण झालेल्या सुमारे १.६५ कोटी महिलांना सध्या योजनेचा लाभ मिळत आहे. तर विविध कारणांमुळे जवळपास ९२ लाख महिला लाभापासून वंचित राहिल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी कागदपत्रांची पूर्तता न झालेल्या किंवा ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिलेल्या पात्र महिलांना पुन्हा योजनेत सामावून घेण्याबाबत आश्वासन दिले होते. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली होती.


८१ लाख महिलांना पुन्हा मिळणार संधी?

ई-केवायसीमधील तांत्रिक अडचणींमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या जवळपास ८१ लाख महिलांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही किंवा प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत, अशा पात्र महिलांना पुन्हा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यासाठी बंद असलेले पोर्टल पुन्हा सुरू करण्याबाबतही चर्चा झाली होती.

लाडकी बहीण योजनेच्या नावाने येणाऱ्या मेसेजपासून सावध!
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून काही महिलांच्या मोबाईलवर लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसंदर्भात मेसेज येत असल्याचे समोर आले आहे. मात्र, योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात कोणतीही नवीन सूचना प्रसिद्ध झाल्याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे महिलांनी अशा मेसेजमधील लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावध राहणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, ई-केवायसीच्या नावाखाली फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनोळखी लिंक उघडू नका, आधारशी संबंधित ओटीपी कोणालाही सांगू नका आणि बँक खात्याची गोपनीय माहिती शेअर करू नका. योजनेबाबतची माहिती केवळ अधिकृत सरकारी वेबसाइट किंवा संबंधित सरकारी कार्यालयातूनच तपासा.
एकल महिलांसाठीही स्वतंत्र योजना आणण्याची तयारी
दरम्यान, राज्य सरकार एकल महिलांसाठी स्वतंत्र योजना सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. पतीचे निधन झालेले, घटस्फोटित आणि परित्यक्ता महिलांना या योजनेचा लाभ देण्याबाबत विचार सुरू आहे. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी एकट्याने सांभाळणाऱ्या महिलांना आर्थिक आधार देणे हा या प्रस्तावामागील उद्देश आहे.
त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी आणि लाभाबाबतच्या अधिकृत निर्णयाकडे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागले आहे.
