शरद पवारांची राष्ट्रवादी इंडिया आघाडीतून बाहेर पडणार? संजय राऊत यांच्या ‘त्या’ विधानाने राजकीय चर्चांना उधाण


मुंबई : केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा डीलिमिटेशन विधेयक संसदेत मांडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपकडून विविध राजकीय पक्षांशी चर्चा केली जात असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डीलिमिटेशन विधेयकाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी इंडिया आघाडीत कायम राहणार की वेगळी भूमिका घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानाचीही चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी अजूनही इंडिया आघाडीत आहे आणि पुढेही राहील, असे राऊत यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या विधानातील ‘अजून’ या शब्दामुळे राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांना सुप्रिया सुळे यांच्या डीलिमिटेशन विधेयकावरील भूमिकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी इंडिया आघाडीतील सर्व पक्ष एकत्र असल्याचे सांगितले. तीन दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे या सोनिया गांधी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यावरून त्या अजूनही इंडिया आघाडीत आहेत आणि यापुढेही राहतील, असे राऊत म्हणाले.

‘डीलिमिटेशन हा भाजपचा नाही, राष्ट्रीय मुद्दा’

डीलिमिटेशन विधेयकाला आमचा तात्त्विक विरोध आहे. हे विधेयक लोकशाहीसाठी घातक ठरू शकते, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली. मतदारसंघांची पुनर्रचना करताना लोकशाहीच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले. या विषयावर केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि द्रमुकशी चर्चा करून चालणार नाही. काँग्रेस, समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस यांसारख्या प्रमुख विरोधी पक्षांशीही चर्चा झाली पाहिजे, असे राऊत म्हणाले.

हा केवळ भाजपचा राजकीय विषय नसून राष्ट्रीय महत्त्वाचा मुद्दा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व प्रमुख पक्षांशी चर्चा करणे आवश्यक आहे. आमचे तीन खासदार असतानाही आमच्याशी चर्चा का केली जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावरून भाजपवर टीका

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावरून भाजपकडून होत असलेल्या टीकेलाही संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. राहुल गांधी यांना अमेरिकेतील विद्यापीठाने निमंत्रित केले असून तेथील विद्यार्थ्यांना त्यांचे विचार ऐकायचे आहेत, असे राऊत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विद्यार्थ्यांसमोर जाऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आव्हान त्यांनी दिले.

विद्यार्थ्यांनी इंग्रजीत प्रश्न विचारल्यास मोदी त्यांची उत्तरे देऊ शकतील का, असा सवाल करत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. देशाची अर्थव्यवस्था गंभीर स्थितीत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, डीलिमिटेशन विधेयक आणि इंडिया आघाडीतील पक्षांच्या भूमिकांवरून आगामी काळात राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंडिया आघाडीतील भूमिकेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!