सिंहगड रोड परिसरात झालेल्या खुनाचा छडा, अनैतिक संबंधाबाबत माहिती पडलं अन् महावितरणमधील अधिकाऱ्याचा खून, आरोपीला गुन्हे शाखेकडून ४ तासात बेड्या..

पुणे : पुणे महावितरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या एकचा भरदिवसा धारदार हत्याराने वार करुन खून केल्याची घटना सोमवारी (ता.४) घडली होती.
ही घटना सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनोहर गार्डन जवळ दुपारी दोनच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकने चार तासात अटक केली आहे.
गोपाळ कैलास मंडवे (वय. ३२ रा. रायकर मळा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सिद्धांत दिलीप मांडवकर (वय.१९ सध्या रा. धायरेश्वर मंदीराजवळ, पोकळे वस्ती, धायरी) असे अटककेलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मयत गोपाळ मंडवे यांचा भाऊ योगेश कैलास मंडवे (वय. ३५ रा. धायरी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीचा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकचे पथक घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार धनंजय ताजणे यांना माहिती मिळाली की, खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी कर्वे रोडवरील एस.एन.डी.टी कॉलेज समोर थांबला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्याबाबत गोपाळ याला माहित झाले. त्यावरुन आरोपीने गोपाळ यांच्या छातीवर, मानेवर धारदार हत्याराने सपासप वार करुन खून केला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर चार तासात आरोपीला अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला सिंहगड रोड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.