अजितदादांच्या आठवणींनी भरलेला क्षण… जय पवार भावुक; राष्ट्रवादी विलिनीकरणावर स्पष्ट भूमिका

बारामती: बारामतीच्या विजयामागे फक्त राजकीय समीकरण नाही, तर दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींची मोठी छाया आहे, असं म्हणत जय पवार यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. “अजितदादा असते तर आजचा दिवस अजून वेगळा झाला असता… पण सगळ्यांनी एकत्र येत सुनेत्रा वहिनींसाठी लढा दिला, हीच खरी ताकद आहे,” असे ते म्हणाले.

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विजयानंतर जय पवारांनी माध्यमांशी संवाद साधत राष्ट्रवादीच्या भविष्यातील वाटचालीवर भाष्य केलं. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं, “दोन्ही राष्ट्रवादीच्या वाटचालीबद्दल किंवा विलिनीकरणाबद्दल मी एकटा ठरवू शकत नाही. विलिनीकरण दोन्ही पक्षांचं होणं गरजेचं आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंचे ज्येष्ठ नेते बसून चर्चा करतील, काही निर्णय घेतील, तर पुढचं चित्र बदलू शकतं.”
त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. कारण बारामतीत शरद पवार गटाने सुनेत्रा पवारांना दिलेला पाठिंबा हा आधीच चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गट पुन्हा एकत्र येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

यापूर्वी सुप्रिया सुळे यांनीही विलिनीकरणाची चर्चा सध्या थांबलेली असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र जय पवारांच्या सूचक वक्तव्यामुळे या चर्चांना नवी दिशा मिळाली आहे.

दरम्यान, “ही निवडणूक फक्त राजकारण नव्हती, तर भावनेची होती,” असं सांगताना जय पवारांनी कार्यकर्त्यांचेही आभार मानले. अजितदादांच्या आठवणींनी भरलेल्या या विजयानंतर राष्ट्रवादीच्या भविष्यातील राजकारणात मोठे बदल घडू शकतात, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.