ऑगस्टच्या वीजबिलाचा मोठा झटका! महावितरणकडून ग्राहकांना शॉक; प्रति युनिट ‘इतक्या’ पैशांची वाढ

पुणे : उन्हाळा संपल्यानंतर वीजबिलात काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा असलेल्या राज्यातील सर्वसामान्य वीजग्राहकांना महावितरणकडून मोठा धक्का बसला आहे.
जुलै महिन्यातील वीजवापरासाठी ‘इंधन समायोजन शुल्क’ लागू करण्यात आले असून, त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या वीजबिलात ग्राहकांना प्रति युनिट अतिरिक्त रक्कम मोजावी लागणार आहे. याचा परिणाम घरगुती ग्राहकांसह व्यावसायिक, औद्योगिक आणि इलेक्ट्रिक वाहनधारकांवरही होणार आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातील विजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली होती. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणला अतिरिक्त वीज महागड्या दराने खरेदी करावी लागली. या अतिरिक्त खर्चाची भरपाई करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या (MERC) निर्देशानुसार इंधन समायोजन शुल्क आकारण्यात येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.


घरगुती ग्राहकांना किती अतिरिक्त पैसे द्यावे लागणार?
वीजवापराच्या श्रेणीनुसार घरगुती ग्राहकांवर प्रति युनिट १० पैशांपासून ६० पैशांपर्यंत अतिरिक्त भार पडणार आहे.
दारिद्र्यरेषेखालील ग्राहक: १० पैसे प्रति युनिट
१०० युनिटपर्यंत वापर: २० पैसे प्रति युनिट
१०१ ते ३०० युनिट: ४० पैसे प्रति युनिट
३०१ ते ५०० युनिट: ५५ पैसे प्रति युनिट
५०० युनिटपेक्षा जास्त: ६० पैसे प्रति युनिट
उद्योग, व्यापारी आणि ई-व्हीकल ग्राहकांनाही फटका
इंधन समायोजन शुल्काचा परिणाम केवळ घरगुती ग्राहकांपुरता मर्यादित नसून व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांनाही अतिरिक्त शुल्काचा भार सहन करावा लागणार आहे. कमी दाबाच्या वाणिज्यिक ग्राहकांसाठी वापराच्या श्रेणीनुसार ४० ते ६० पैसे प्रति युनिट शुल्क लागू करण्यात आले आहे.
कमी दाबाच्या औद्योगिक ग्राहकांसाठी २५ ते ३५ पैसे, तर उच्चदाब औद्योगिक ग्राहकांसाठी श्रेणीनुसार ३० ते ४५ पैसे प्रति युनिट अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.
इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनसाठी ३० पैसे प्रति युनिट अतिरिक्त शुल्क लागू करण्यात आले आहे. त्यामुळे ई-व्हीकल चार्जिंगच्या खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे.
शेतीच्या वीजवापरावरही शुल्क
शेतीसाठी प्रति युनिट १५ ते २५ पैसे इंधन समायोजन शुल्क लागू करण्यात आले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या वीजबिलाचा भार राज्य सरकारकडून उचलला जात असल्याने या शुल्कवाढीचा अतिरिक्त आर्थिक भार सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे.
एप्रिलमध्ये नवीन वीजदर लागू करताना वीज स्वस्त झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, आता इंधन समायोजन शुल्काची भर पडल्याने ग्राहकांच्या वीजबिलात पुन्हा वाढ होणार आहे. त्यामुळे महावितरणच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.