शेतकरी कुटुंबातील लेकीने गावची वाढवली शान, मंत्रालय महसूल अधिकारीपदी निवड, दौंड तालुक्यातील आकांक्षाचे भरभरून कौतुक..

यवत : संघर्ष जिद्द, चिकाटी, आणि आत्मविश्वास या सर्वांच्या जोरावर दौंड तालुक्यातील बोरीऐंदी झुरंगेमळा येथील शेतकरी कुटुंबातील मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून मंत्रालय महसूल सहाय्यक अधिकारी पदाला गवसणी घालत आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
आकांक्षा संतोष झुरंगे (रा.झुरंगेमळा बोरीऐंदी, ता.दौंड जि.पुणे) आकांक्षा ला मिळालेले यश पाहण्यासाठी तिचे वडील या जगात नाहीत. आई, भाऊ, नातेवाईक यांनी आकांक्षाचे भरभरून कौतुक केले.
आईने दोन्ही मुलांना शेतात कष्ट करून शिकवले.आकांक्षाचे प्राथमिक शिक्षण उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात झाले तर पुढील शिक्षण पुणे येथे नामांकित विद्यालयात झाले.
घरची परिस्थिती बेताची पण अधिकारी होण्याचे स्वप्न होते. प्राथमिक ते पदवी पर्यंत शैक्षणिक प्रवासात आकांक्षाने अनेक कष्ट, व हालअपेष्टा सहन केल्या. मात्र तरी देखील नडगमगता स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिली. याकाळात तीला आई, भाऊ व इतर नातेवाईक यांनी आवश्यक ते योग्य मार्गदर्शन केले.
यावेळी दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती महादेव यादव,बोरीऐंदीचे सरपंच भानुदास कुदळे, सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र तावरे व संचालक संदीप गायकवाड यांनी आकांक्षाला मिळालेल्या यशाचे कौतुक करीत गावातील तरुणांनी स्पर्धा परीक्षेमध्ये उतरून मनापासून अभ्यास करून यश मिळवावे असे मत व्यक्त केले आहे.