व्हायरल व्हिडीओमुळे निलंबन, महिन्याभरातच पुनरागमन; डेक्कन कॅफे कारवाईतील PSI कदम प्रकरणाला नाट्यमय कलाटणी


पुणे : डेक्कन परिसरातील एका कॅफेवरील मध्यरात्रीच्या कारवाईमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पोलिस उपनिरीक्षक संदीप कदम पुन्हा सेवेत दाखल होणार आहेत. विभागीय आढावा समितीच्या शिफारशीनंतर पोलिस आयुक्तांनी त्यांचे निलंबन रद्द केले असून, गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

शहरात रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या खाद्य व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली होती. या पार्श्वभूमीवर ६ जूनच्या मध्यरात्री गस्तीवर असताना कदम यांनी शिरोळे रोडवरील ‘फ्लाइंग जिप्सी’ कॅफेची पाहणी केली. रात्री सव्वा ते दीडच्या सुमारासही ग्राहकांची वर्दळ सुरू असल्याचे दिसून आले. कारवाईदरम्यान त्यांनी ग्राहकांना बाहेर जाण्यास सांगितले. या गडबडीत काउंटरवरील काही कॉफीचे ग्लास व खाद्यपदार्थ खाली पडले.

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर कदम यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आणि २९ जून रोजी त्यांना निलंबित करण्यात आले. मात्र, चौकशीत संबंधित कॅफेविरुद्ध यापूर्वीही अनेकदा नियमभंगाच्या तक्रारी व कारवाया झाल्याचे समोर आले. तसेच कदम यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार रात्रीच्या निर्बंधांची अंमलबजावणी करत कर्तव्य बजावल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला.

८ जुलैला झालेल्या आढावा बैठकीत संपूर्ण प्रकरणाचा फेरविचार करण्यात आला. त्यानंतर निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला. या निर्णयामुळे पोलिस दलात समाधान व्यक्त होत असून, नियमांची कठोर अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशासनाचे पाठबळ मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!