डॉक्टराचे अपहरण करुन २७ लाख रुपयांचा दरोडा, पत्नी, मेव्हण्याने सुपारी दिल्याचा संशय; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा..

पुणे : कुत्रा आजारी असल्याचे सांगून व्हॅटरनरी डॉक्टरला बोलावून त्याचे अपहरण करण्यात आले. त्याला जबरदस्तीने त्याच्या घरात आणून सोन्याचे दागिने, २५ लाख रुपये रोख असा २७ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
हा प्रकार वडकी येथील पवार वस्तीत बुधवारी सायंकाळी पावणेपाच वाजता घडला. याप्रकरणी एका ४८ वर्षाच्या डॉक्टराने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्हेटनरी डॉक्टर आहेत. त्यांचा व पत्नीचा न्यायालयात घटस्फोटासाठी खटला सुरु आहे. त्यात मालमत्तेचा वादही आहे. त्यांना बुधवारी वडकी येथील पवार वस्तीत कुत्रे आजारी असल्याचे सांगून उपचारासाठी बोलावले. त्यानुसार ते तेथे गेले.
तेव्हा १० जणांना विचारणा केली. त्यातील २ ते ३ जणांनी त्यांना एका कारमध्ये जबरदस्तीने बसवून अपहरण केले. त्यांना दिवे घाटमार्गे वनपुरी आंबोडी, वाघापूर या ठिकाणी नेऊन जीवे मारण्याची धमकी दिली. चाकूने हाताला दुखापत केली. पैसे कोठे आहेत, अस म्हणून गळ्याला व पोटाला चाकू लावून तुझ्या नावाची तुझी पत्नी व मेव्हण्याने सुपारी दिली आहे.
तुला आम्ही संपवून टाकणार आहे, अशी धमकी दिली. तू आम्हाला २० लाख रुपये दिले तर तुला आम्ही सोडू, तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही, असे सांगितले. त्यानंतर त्यांना त्यांच्या स्वत:च्या घरी आणले.
त्यांचा मोबाईल व घराच्या चाव्या जबरदस्तीने घेतल्या. घरातून २ लाख १० हजार रुपयाचे सोन्याचे दागिने व रोख २५ लाख रुपये असे २७ लाख १० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेतले.
त्यांना घेऊन चोरटे पुन्हा शिंदवणे घाटात आले. तेथे या डॉक्टरांना सोडून ते पळून गेले. फिर्यादीच्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गोरे तपास करीत आहेत.