शिक्षकी पेशाला काळीमा! शाळेत एकटी असल्याचा फायदा, शिक्षकाचा विद्यार्थीनींवर अत्याचार.., गर्भवती झाल्यानंतर प्रकार उघड..

अहिल्यानगर : गेल्या काही दिवसांपासून महिला आणि मुलींच्या अत्याचाराच्या घटना वाढत असताना अहिल्यानगरमधील घारगाव परिसरात शिक्षक आणि विद्यार्थिनींच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.शाळेत एकटी राहणाऱ्या आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या आठवीतील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत शिक्षकाने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगी गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

समोर आलेल्या माहितीनुसार,अमोल बाबासाहेब भोसले (वय 23, ता. संगमनेर) असं अटक करण्यात आलेल्या शिक्षकाच नाव आहे. संबंधित पीडित मुलगी ही खासगी माध्यमिक शाळेत शिक्षण घेत आहे. घरातील परिस्थितीमुळे सर्वजण बाहेर कामास गेल्याचा फायदा घेत तसेच तिच्या मानसिक अवस्थेचा फायदा घेत शिक्षक भोसले याने तिच्याशी संवाद साधत जवळीक वाढवली. तिच्याशी मैत्री करत तिला प्रेमाचा संदेशातून भावनिक आधार देण्यास सुरुवात केली.
मुलगी घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर तो वारंवार अत्याचार करत असे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नव्हता. काही दिवसांपूर्वी मुलीला पोटदुखीची तक्रार सुरू झाली. उपचारासाठी तिला पिंपरी-चिंचवड येथील रुग्णालयात नेण्यात आले असता ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी आरोपीवर भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झिरो क्रमांकाने गुन्हा नोंदवून तपास घारगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
