वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन मुलांना व नागरीकांना मारहाण प्रकरण! लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी बरोबरच, मुख्यालयात बदल्या
उरुळी कांचन : लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत भोसले चाळीत घरासमोर वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन मुलांना व नागरीकांना मारहाण करणारे पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे व त्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या आहेत.
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. १६) रात्री साडेनऊ वाजनेच्या सुमारास भोसले चाळीसमोर संतोष भोसले यांच्या वाढदिवसाचा केक कापत असतांना पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे व त्यांच्या तीन सहकारी पोलिसांनी अल्पवयीन मुले व काही नागरीकांना बेदम मारहाण केली होती.
यावेळी मारहाण करु नये अशी विनंती करणाऱ्या महिलांनाही पोलिसांना शिवीगाळ केली होती. याबाबतची लेखी तक्रार मिळूनही वरीष्ठांनी वैभव मोरे यांच्यासह संतोष राठोड व सभांजी देवीकर या त्यांच्या सहकाऱ्यांच्या बाबत ठोस भुमिका न घेतल्याने, नागरीकांच्यात मोठी नाराजी पसरली होती.
घडलेल्या घटनेस ४८ तास उलटुनही, वरील तिघांच्या विरोधात ठोस कारवाई होत नसल्याने, संतोष भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी (ता. 21) रोजी गावातील सर्व प्रकारचे व्यवहार बंद ठेवण्याबरोबरच, पोलिस ठाण्यावर मोर्चाचे नियोजन केले होते.
दरम्यान, शनिवारी ( ता.२०) सकाळीच अल्पवयीन मुलांना व नागरीकांना मारहाण करणारे पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे व त्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या आहेत.
तसेच वरील तीनही जणांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आल्याची घोषणा लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांनी केली. पोलिस निरीक्षक कारवाईबाबत माहिती दिल्याने, भोसले कुटुंबियांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.