दौंड येथे गॅस सिलेंडर स्फोट झालेल्या हॉटेल जगदंबाच्या मालक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

दौंड : दौंड – पाटस रोडवर गिरीम च्या हद्दीत असणाऱ्या हॉटेल जगदंबा येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन यात १० जण भाजले होते. हि घटना बुधवार (ता.७) रोजी ही घटना घडली.

या प्रकरणी आता दौंड पोलिसांनी हॉटेल मालक आणि मॅनेजरवर निष्काळजीपणा आणि घरगुती सिलेंडरचा व्यवसायिक वापर केल्याप्रकरणी भा.न्या.स.का. क 125 (a), 125 (b), 287, 288; अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम ७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
काल घडलेल्या गंभीर घटनेबाबत महेष सदाशिव भोसले (वय.४२, पोहवा ११५८, नेमणूक दौंड पोलीस) यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून हॉटेल जगदंबा चे मालक आरोपी किरण आबा सौताडे व हॉटेल मॅनेजर लहू विश्वनाथ जानभरे (दोघे रा. राशीन, ता. कर्जत, जि अहिल्यानगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड पोलिसांनी परवाची सर्व परीस्थिती पाहता यातील जगदंबा हॉटेलचे मालक किरण आबा सौताडे व मॅनेजर नामे लहू विश्वनाथ जानभरे दोघे (रा. राशीन, ता कर्जत, जि अहिल्यानगर) यांच्यावर निष्काळजी पणाचा ठपका ठेवला आहे.

(ता.७) रोजी दुपारी १.०० च्या पुर्वी हॉटेल जगदंबा, (दौंड पाटस रोड, गिरीम, ता.दौंड, जि पुणे) येथील किचनमध्ये ज्वलनषील पदार्थाबाबत निष्काळजीपणाचे वर्तन करून, सदर ठिकाणी एकूण घरगुती वापराच्या भारतगॅस कंपनीचे विनापरवाना १२ गॅस सिलेंडर ठेवले होते व त्यासोबत १० भारतगॅस कंपनीचे कमर्शियल वापराचे गॅस सिलेंडर ठेवून कोणत्याही प्रकारची ज्वलनषील पदार्थ हाताळतानाची काळजी न घेतल्याने वरील सिलेंडरपैकी घरगुती वापराच्या १ गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन यात १० जण भाजले.