पुण्यात गणपती दर्शनाला जाणार? मेट्रो आता दर ५ मिनिटांनी; प्रवासाआधी ‘या’ सूचना नक्की वाचा


पुणे : गणेशोत्सवात पुण्यातील मानाचे आणि प्रसिद्ध गणपतींच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पुण्यात दाखल होतात. या काळात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन महामेट्रोने प्रवाशांसाठी विशेष नियोजन केले आहे. गणेशोत्सवाच्या गर्दीच्या वेळेत आता दर 5 मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सध्या पुणे मेट्रोच्या वनाझ-रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड-स्वारगेट या दोन्ही मार्गिकांवर दररोज सुमारे अडीच लाख प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्या वेळेत सध्या साधारण 6 मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावते. गणेशोत्सवात प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने हा अंतराल कमी करण्यात येणार आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून चाचण्याही घेण्यात येत आहेत.

महामेट्रोचे सर्व 33 रेक सेवेत

गणेशोत्सवाच्या काळात महामेट्रोच्या ताफ्यातील सर्व 33 रेक सेवेत आणले जाणार आहेत. यापैकी 17 रेक वनाझ-रामवाडी मार्गावर, तर 16 रेक पिंपरी-चिंचवड-स्वारगेट मार्गावर धावतील. गर्दी कमी असलेल्या वेळेत मेट्रो दर 10 मिनिटांनी उपलब्ध राहणार आहे.

गणपती दर्शनासाठी स्थानकांचे विशेष नियोजन

पुण्यातील मध्यवर्ती पेठांमध्ये दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता काही प्रमुख मेट्रो स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मंडई स्थानक: गणपती दर्शन आटोपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी मंडई स्थानकाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पीएमसी आणि छत्रपती संभाजी उद्यान स्थानक: वनाझ-रामवाडी मार्गाने येणाऱ्या भाविकांनी दर्शनासाठी जाताना या स्थानकांवर उतरावे, असे नियोजन आहे.

कसबा पेठ स्थानक: पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गावरून येणाऱ्या प्रवाशांनी गणपती दर्शनासाठी कसबा पेठ स्थानकाचा वापर करावा, असे सांगण्यात आले आहे.

मंडई स्थानकावर सुरक्षा मॉक ड्रिल

गणेशोत्सवात गर्दीच्या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणा तातडीने कार्यरत करता यावी, यासाठी पुणे पोलीस आणि मेट्रो प्रशासनाने महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकावर संयुक्त मॉक ड्रिल घेतली.

गणेशोत्सवातील वाढती गर्दी लक्षात घेऊन दर 5 मिनिटांनी मेट्रो सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!