स्वारगेट अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट, पोलीस पुन्हा जाणार शेतात, वेगळीच माहिती आली पुढे…

पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी ७० तासांच्या अथक शोध मोहिमेनंतर शिरूर येथे उसाच्या शेतातून अटक केली. मात्र, तपासादरम्यान त्याच्या गुन्हेगारी कृत्यांबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे.
आता आरोपी दत्तात्रय गाडे याचा मोबाइल शोधण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक पुन्हा एकदा गुनाटमधील शेतात जाणार आहे. या प्रकरणात आरोपीच्या मोबाइलमध्ये आणखी काही महत्त्वाचे पुरावे मिळू शकतात, अशी खात्री पोलिसांना आहे.
स्वार गेट एसटी स्थानकात २५ फेब्रुवारीला पहाटे शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला. या प्रकरणात दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून, वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे यांचे पथक आता तपास करीत आहेत.
तसेच आरोपीचा मोबाइल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. प्राथमिक तपासात हा फोन गाडेने गुनाट गावातील एका शेतात फेकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गुन्हे शाखेचे पोलिस त्या परिसरात जाऊन मोबाइलचा शोध घेणार आहेत.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, आरोपीचा मोबाइल मिळाल्यास गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरोपीने मोबाइल फेकल्याचा दावा खरा आहे की, तो पोलिसांना दिशाभूल करत आहे, हे लवकरच स्पष्ट होईल.