विषारी कफ सिरपमुळे नागपूरमध्ये बाळाच्या मेंदूला सूज येऊन मृत्यू, भयंकर माहिती आली समोर…


नागपूर : विषारी कफ सिरपमुळे नागपुरात आणखी एका बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धानी डेहरिया या १८ महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. नागपुरातील शासकीय मेडिकल रुग्णालयात उपचारादरम्यान धानीचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातून धानीला नागपुरात उपचारासाठी गंभीर स्थितीत दाखल करण्यात आले होते. यात किडनी निकामी होऊन मेंदूवर सूज आल्याने धानीवर मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. धानी डेहरियाच्या मृत्यूनंतर कफ सिरपमुळे नागपुरात उपचार दरम्यान एकूण मृत्यूसंख्या हि दहावर पोहचली आहे.

कफ सिरपमुळे लहान मुलांच्या मृत्यूनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयच्या पथकाने शासकीय मेडिकल रुग्णालयात पोहचून परिस्थितीचा आढावा घेतलाय. DMERच्या चमूमध्ये बीजे महाविद्यालयातील बालरोग विभाग प्रमुख डॉ. आरती किनीकर, जेजे महाविद्यालयातील बालरोग विभाग प्रमुख डॉ. छाया वळवी, जे जे महाविद्यालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख भालचंद्र चिकलकर यांच्या समावेश आहे.

       

यावेळी उपचार सुरू असलेल्या रुग्णांची स्थिती, त्यांच्यावर सुरू असलेले उपचार आणि मेडिकल हिस्ट्री तपासण्यात आलीय. तर ‘एम्स नागपूर’च्या नेतृत्वात केंद्राच्या पथकाने छिंदवाडा जिल्ह्यातील परासीया तालुक्यात जाऊनही पाहणी केलीय. कफ सिरपमुळे सर्वाधिक मुले परासीया तालुक्यातील प्रभावित झाली आहेत. केंद्रीय पथक पुढील तीन दिवसांत आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, खोकल्याच्या औषधामुळे चिमुकल्यांना विषबाधा होऊन होणाऱ्या मृत्यूच्या धक्कादायक घटनांमुळे देशभरात सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या गंभीर प्रकरणी आता केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे लहान मुलांना ‘कफ सिरप’च्या वापराबाबत दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!