राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? शरद पवार अजित पवार गुप्त बैठकीवर माजी मुख्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य…

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील त्या ठिकाणी उपस्थित होते.
यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. आता शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीच्या चर्चा झाल्याने राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. यामुळे भविष्यात काहीही होऊ शकते, असेही म्हटले जात आहे.
यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शरद पवार आणि अजित पवार यांचीही भेट गुप्त राहिलेली नाही. त्याचे फोटो व्हिडिओ माध्यमांकडे आहेत तर पक्ष फुटी नंतर दोन्ही नेते भेटत असल्याने जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल असे वातावरण करत आहेत.
त्यामुळे नक्की काय सुरू आहे हे दोघांनी स्पष्ट करणे गरजेचे आहे. दरम्यान, मागच्या काही दिवसापूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादीसोबत बंडखोरी करत भाजपसोबत हात मिळवणी केली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
त्यानंतर आता काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. यावेळी अजित पवार यांनी ही बैठक गुप्त ठेवण्याचा मोठा प्रयत्न केला.