डोळ्याच्या साथीने वाढवले टेंशन, रुग्णांची संख्या वाढली, ‘अशा’ प्रकारे घ्या डोळ्यांची काळजी…

पुणे : मागील काही दिवसांपासून राज्यभरात डोळ्यांची साथ पसरली आहे. पुणे जिल्ह्यातही या साथीने डोके वर काढले असून अनेकांचे डोळे येणे सुरू झाले आहेत. लहान मुलांचे देखील डोळे येत असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली आहे.

दिवसागणिक शहरात काळा चष्मा लावून फिरणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. जिल्ह्यातील अनेक जणांना या साथीने ग्रासलं असून एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल १ हजार ९० रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे पुणेकरांचं टेन्शन वाढलं असून ऐन पावसाळ्यात डोळ्यांची काळजी घ्यावी लागणार आहे. चिंताजनक बाब म्हणजे या साथीचा प्रसार शहरासह ग्रामीण भागातही झपाट्याने होत आहे.

पुणे जिल्ह्यातील डोळ्याच्या साथीने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या १३ हजार ९९८ इतकी झाली आहे. यातील ९ हजार ९८ रुग्ण ग्रामीण भागातील असल्याची माहिती आहे. दिलासादायक बाब म्हणजे यापैकी एकूण ८ हजार ५१७ रुग्ण आधीच बरे झाले आहेत.
डोळे येण्याची लक्षणे कोणती.. ?
डोळ्यातून वारंवार पाणी गळणे सुरू होते.
अचानक डोळे लाल होतात.
डोळ्यांना सूज तसेच खाज देखील येते.
काही वेळा डोळ्यातून चिकट द्रवपदार्थ बाहेरील बाजूस येतो.
डोळे जड वाटतात आणि डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे वाटते.
बचावाचे उपाय
हात सतत धुवत राहणे आणि संसर्गापासून वाचण्यासाठी डोळ्यानां हात लावू नये.
डोळे स्वच्छ करण्यासाठी कॉमन किंवा खराब टॉवेलचा वापर करू नये. दुसर्याचा रुमाल वापरण्याचे टाळावे. कारण यामुळे कंजक्टिवायटिस होवू शकतो.
पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करू नये. कारण डोळ्यात कोरडेपणा वाढू शकतो. डोळे लाल होणे आणि जळजळ होण्याचे प्रकार वाढू शकतात.
दररोज थंड पाण्याने डोळे धुवावे , डोळ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल, खाज सुटत असेल तर डॉक्टरांना तात्काळ दाखवावे.
पावसाळ्यात स्विमिंग पूलचा वापर करू नये. कारण यामुळे आपल्या डोळ्यात बॅक्टेरियाचे संक्रमण होण्याचा धोका वाढू शकतो. स्विमिंग आवश्यक असेल तर पोहताना आइज मास्कचा वापर करावा.