‘फॉरएव्हर बाय’चा मेसेज, मध्यरात्री मृत्यू अन् रातोरात अंत्यसंस्कार! २४ वर्षीय शिल्पाच्या प्रकरणात शेतात काय सापडलं?


छत्रपती संभाजीनगर : मित्राला शेवटचा गूढ संदेश पाठवणारी २४ वर्षीय तरुणी मृतावस्थेत आढळली. कुटुंबीयांनी आत्महत्येचा दावा केला, मात्र शवविच्छेदन होण्यापूर्वीच अंत्यसंस्कार झाल्याचा आरोप समोर आला. जटवाडा परिसरातील पुलतांडा येथील या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले असून, अंत्यसंस्कार झालेल्या शेतातून मानवी अवशेष जप्त केल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा अधिक व्यापक केली आहे. शिल्पा राठोड हिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शिल्पा (वय २४) हिने नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले होते. ती सेव्हन हिल परिसरातील एका खासगी रुग्णालयात नोकरी करत होती. शुक्रवारी मध्यरात्री ती राहत्या घरातील स्वयंपाकघरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृतदेह पुढील तपासणीसाठी घाटी रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आल्याचे सांगितले जाते. तरीही मृतदेह घरी आणून रात्रीच्या वेळी शेतात अंत्यसंस्कार केल्याचा आरोप आहे. या संपूर्ण घटनाक्रमाची सत्यता तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

‘आता बोलणं होणार नाही’… संदेशामागचं रहस्य काय?

मृत्यूपूर्वी शिल्पाने एका मित्राला ‘फॉरएव्हर बाय, आता बोलणं होणार नाही,’ असा संदेश पाठवल्याची माहिती समोर आली आहे. मित्राने तिला असे बोलू नकोस, असा प्रतिसाद दिल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी तिचा मोबाईल ताब्यात घेतला असून, या संभाषणाचा घटनाक्रमाशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. केवळ या संदेशावरून मृत्यूचे कारण ठरवता येणार नसल्याने इतर पुराव्यांचीही पडताळणी केली जात आहे.

फॉरेन्सिक पथकाने शेतातून काय जप्त केले?

शनिवारी सकाळी घटनेची माहिती मिळाल्यानंतर हर्सूल पोलिसांनी चौकशी सुरू केली. पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक स्वाती केदार, सहायक निरीक्षक सचिन सदाफले आणि सहायक फौजदार सुभाष शेवाळे यांनी तपास केला. ज्या शेतात अंत्यसंस्कार झाल्याचे सांगितले जाते, तेथून फॉरेन्सिक पथकाने मानवी हाडे आणि अस्थी जप्त केल्या आहेत.

आता जप्त अवशेषांची तपासणी, मोबाईलमधील संदेश आणि अन्य पुराव्यांच्या आधारे मृत्यूची वेळ व कारण निश्चित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिल्पाचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की अन्य काही कारणामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपासातून मिळणाऱ्या निष्कर्षांनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!